अ‍ॅसिड हल्ल्यामधून बचावलेल्या महिलांपैकी एक असणाऱ्या बाला या तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. बालाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. कौटुंबिक वादामधून बालावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. १२ वेगवेगळ्या शस्त्रक्रीया झाल्यानंतर बाला पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभी राहिली. ती सध्या आग्रा येथील शीरोज कॅफेमध्ये काम करत असली तरी या अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. बालाने  दीपिका पदुकोण आणि कपिल शर्मासारख्या कलाकारांसोबत कामही केलं आहे. मात्र आयुष्य पूर्वपदावर येत असतानाच आता मूत्रपिंडाच्या विकारामुळे मृत्यूशी झुंज देत आहे.

बालाला किडनीसंदर्भात उपचार करण्यासाठी १६ लाखांची गरज आहे. ती काम करत असणाऱ्या कॅफेकडून ऑनलाइन क्राउड फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा छपाक चित्रपटामध्ये अ‍ॅसिड हल्ल्यामधून बचावलेल्या महिलेची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला यासंदर्भात समजलं तेव्हा तिने गुरुवारी सकाळी बालाला १० लाखांची मदत केली आणि रात्री पुन्हा पाच लाख रुपयांची मदत पाठवली. आता दीपिकाच्या मदतीमुळे बालावर उपचार होऊ शकणार आहेत.

बाला ही उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे राहता. २५ वर्षीय बाला ही ९ वर्षांपूर्वी सर्वसामान्य मुलींप्रमाणे आयुष्य जगत होती. मात्र एका कौटुंबिक वादामधून झालेल्या भांडणामध्ये घरात घुसून बाला आणि तिच्या आजोबांवर अ‍ॅसिड फेकण्यात आलं. या हल्ल्यामध्ये तिच्या आजोबांचा मृत्यू झाला. तर गळा, हात आणि चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्यात आल्याने बाला गंभीर जखमी झाली. या हल्ल्यानंतर बालावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. तिच्यावर तब्बल १२ शस्त्रक्रीया करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा बालाची प्रकृती मूत्रपिंडासंदर्भातील आजारामुळे खालावलीय.

बालाचा चेहरा अ‍ॅसिड हल्ल्यामुळे विद्रूप झाल्याने तिचे आई वडील आणि तीन छोटे भाऊ फारच घाबरले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच बेताची असल्याने त्यांना फार संघर्ष करावा लागला. या हल्ल्यानंतर बाला अनेक दिवस स्वत:चा चेहरा आरशात बघू इच्छित नव्हती. त्याचदरम्यान तिची ओळख अ‍ॅसिड हल्ल्यामधून बचावलेल्या अंशुसोबत झाली. त्यानंतर बालाने छांव फाउंडेशनची मदत घेण्याचा निर्णय़ घेतला. २०१७ साली याच माध्यमातून बालाला शिरोज हँगआऊट कॅफेमध्ये नोकरी मिळली. आता ती आपल्या कुटुंबाला पगराच्या माध्यमातून आर्थिक मदत करतेय.

सर्व काही पूर्वव्रत होत असताना अचानक तिची प्रकृती खालावली. उपचारादरम्यान बालाचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचं समोर आलं. सध्या तिच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयामध्ये उफचार सुरु आहेत. दोन डायलीसिसनंतर डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला आहे.

बालाने आपल्या आयुष्यात कधीच खचून न जाता परिस्थितीचा सामना केलाय. तिने कॉमेडी नाइट्स विथ कपिलमधून समाजाला अ‍ॅसिड हल्ल्यामधून बचावलेल्या महिलांची बाजू समजावून सांगितलं. काही काळापूर्वी मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक चित्रपटामध्ये बालाने अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतही काम केलं आहे. आता बालाची मदत करण्यासाठी दीपिका पुढे आली असून तिच्या मदतीमुळे बालाला जीवनदान मिळणार आहे.