संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटावरून देशभरात झालेले रणकंदन सर्वांना चांगलेच माहित आहे. करणी सेनेचा तीव्र विरोध, भन्साळी आणि मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणला देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, जाळपोळ, आंदोलने या सर्व गोंधळानंतर चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या गोष्टींचा दीपिकाने चांगलाच धसका घेतला आहे असे म्हणावे लागेल. कारण ‘पद्मावत’नंतर कुठलीही ऐतिहासिक भूमिका साकारणार नसल्याचे तिने जाहीर केले आहे.

चित्रपटाला विरोध झाला तरी प्रेक्षकांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या चार दिवसात ‘पद्मावत’ने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या यशानंतर एका कार्यक्रमात दीपिकाला पत्रकारांनी भविष्यात अशा ऐतिहासिक भूमिका साकारणार का असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता तिने थेट नकारार्थी मान हलवली. ‘पद्मावतविरोधी देशातील हे वातावरण पाहता यापुढे ऐतिहासिक भूमिका साकारणार नाही,’ असे तिने स्पष्ट केले.

Padmaavat Box Office Collection Day 4: परदेशातही ‘पद्मावत’ने रचला इतिहास

कमाईत १०० कोटींचा आकडा पार करणारा ‘पद्मावत’ दीपिकाचा सातवा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला बॉलिवूडची ‘राणी’ दीपिकाच आहे असे म्हणायला हरकत नाही. पण भविष्यात चाहत्यांना ती ऐतिहासिक भूमिकेत दिसण्याची शक्यता धूसर आहे.