‘फोब्र्ज’च्या यादीत जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दहावी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणचा शिरकाव झाला आणि आता सर्वाधिक महागडी अभिनेत्री म्हणूनही तिच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बॉलीवूडमधला असमान वेतनाचा मुद्दा वर्षांनुवर्षे सुरू आहे आणि आजही तो संपलेला नाही, मात्र दीपिकाच्या यशामुळे गेली कित्येक वर्षे या अभिनेत्रींसाठी सर्वाधिक मानधनाची १० कोटी रुपयांची जी मर्यादा होती ती गळून पडली आहे. गेली काही वर्षे सातत्याने हॉलीवूड-बॉलीवूड दोन्हीकडे डंका वाजवणाऱ्या प्रियांका चोप्रालाही १० कोटी रुपयांपलीकडे जाणे शक्य झाले नव्हते. दीपिका केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर जाहिरातींसाठीही महागडी अभिनेत्री ठरली आहे. भन्साळींच्या ‘पद्मावती’साठी तिने १२.६२ कोटी रुपये मानधन घेतले आहे. याआधी ‘राम लीला’साठी तिला भन्साळींकडून १ कोटी रुपये मानधन मिळाले होते. त्यानंतर ‘बाजीराव मस्तानी’साठी हाच आकडा ७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. ‘पद्मावती’साठी तर थेट १० कोटींचेही बंधन तिने तोडले आहे. जाहिरातींमध्येही तिचे पारडे जड आहे. सगळे मोठे ब्रॅण्ड्स दीपिकाकडे आहेत. ‘व्होग’, ‘तनिष्क’, ‘टिसॉ’ आणि ‘अ‍ॅक्सिस बँक’चे प्रतिनिधित्व दीपिकाकडे आहे. तर ‘विस्तारा एअरलाइन्स’ही तिच्या खात्यात जमा झाले आहे. ‘टाटा ग्रुप’ आणि ‘सिंगापूर एअरलाइन्स’ यांची भागीदारी असलेल्या ‘विस्तारा एअरलाइन्स’चा चेहरा म्हणून दीपिका जगासमोर येणार आहे. त्यामुळे महागडी अभिनेत्री असाच तिचा बोलबाला होतो आहे.