बॉलीवूडमध्ये नायिकेला नायकाच्या तोलामोलाची भूमिका मिळणं किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस भूमिका करायला मिळणं, नायकापेक्षाही जास्त मानधन मिळणं असे प्रकार आजवर फार घडलेले नव्हते. दीपिकाच्या तिन्ही भन्साळी चित्रपटांनी तिच्यासाठी यशाची ही अवघड वाटणारी बॉलीवूडी समीकरणं शक्य करून दाखवली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रामलीला गोलियों की रासलीला या चित्रपटात दीपिका आणि रणवीर ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली, यात दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या होत्या मात्र चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला आणि यशाचं श्रेय, कौतुक दोन्हीमध्ये दीपिकाचं पारडं जड होतं. या चित्रपटाने २२० कोटी रुपयांची कमाई करत दीपिकाला नायिकांमध्येच नाही, तर नायकांमध्येही आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ २०१३ साली प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानीतील मस्तानीने लोकांची मनं जिंकली. या चित्रपटानेही जवळपास ३५० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली होती. आता भन्साळीकृत या जोडीचा तिसरा चित्रपट पद्मावतही वेगाने शंभर कोटींकडे धाव घेतो आहे. यशाची ही भन्साळी हॅटट्रिक साधणारी दीपिका सध्या कौतुकात आणि आनंदात न्हाऊन निघते आहे.

पद्मावत प्रदर्शित होण्याच्या मार्गातले करणी सेना नामक अडथळे जेव्हा वाढले तेव्हाही दीपिकाने एका अर्थाने हा तिचाच चित्रपट आहे हे लक्षात घेऊन विरोध करणाऱ्यांना चार शब्द सुनावले होते. त्यानंतर अगदी तिचे नाक कापण्याची भाषा करणाऱ्यांना तितक्या खालच्या स्तरावर जाऊन उत्तरं देण्याचा मोह तिने टाळला, मात्र शुक्रवारी पहिल्या दिवसांचे बॉक्स ऑफिसवरचे आकडे आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यानंतर आतापर्यंत शांत बसलेल्या दीपिकाने पहिल्यांदाच आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. हा आनंद साजरा करण्याचा क्षण आहे. या चित्रपटाला इतक्या अडचणींतून मार्ग काढावा लागला, मात्र आता जो लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे भारावून गेले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे लवकरच सगळ्यांना कळेल, असे म्हणणाऱ्या दीपिकाने विरोधकांना उत्तरं देण्यापेक्षा आमच्या कामातूनच त्यांना योग्य ते उत्तर मिळेल, अशा शब्दांत चित्रपटाला विनाकारण विरोध करणाऱ्यांना गप्प केले आहे. खरं म्हणजे चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईच्या आकडय़ांबाबत कधीही विचार न करणाऱ्या दीपिकाने यावेळी मात्र या आकडय़ांवर आपले लक्ष केंद्रित झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. माझे चित्रपट किती कमाई करतात याकडे मी क धीच लक्ष देत नाही. पण पद्मावत बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आहे, याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट विक्रम करणार, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

अर्थात, कोटय़वधीची नायिका म्हणून आज जे कौतुक तिच्या वाटय़ाला आलं आहे त्याचं श्रेय ती भन्साळी यांना देते. रामलीला चित्रपटाच्या यशानंतर तिच्याबाबतीत बॉलीवूडची समीकरणंच बदलून गेली. आशयघन चित्रपटांतून सशक्त भूमिका करत यश मिळवणाऱ्या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आहेतच मात्र ऐतिहासिक किं वा पीरिअड चित्रपटांतूनही मध्यवर्ती भूमिका करत व्यावसायिक चित्रपटांची नायिका म्हणून तो खांद्यावर पेलून धरण्याची तिची क्षमताही तिने सिद्ध केली आहे. यानिमित्ताने, पद्मावतसाठी पहिल्यांदाच रणवीर सिंगपेक्षाही जास्त मानधन आपल्याला मिळाले असल्याची कबुलीही तिने दिली आहे.

रणवीर आणि दीपिका जोडीचाही हा तिसरा चित्रपट हिट झाला आहे. खरं म्हणजे याबद्दल बोलताना तिने आश्चर्य व्यक्त केले. भन्साळींनीच आम्हाला पहिल्यांदा रामलीला चित्रपटात एकत्र आणलं. रामलीला आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही प्रेमकथांमध्ये आम्हाला नायक-नायिका म्हणून एकत्र आणल्यानंतर पद्मावतमध्ये त्यांनी थेट आम्हाला टोकाच्या नकारी नातेसंबंधांमध्ये एकत्र आणलं. आणि त्यातही त्यांना यश मिळालं असं सांगताना भन्साळी यांचा दिग्दर्शक म्हणून असलेला दृष्टिकोन जास्त भावणारा असल्याचेही तिने स्पष्ट केले. रणवीर आणि दीपिका यांच्या नात्याबद्दल गेली काही र्वष सातत्याने चर्चा होत असली, तरी पद्मावत प्रदर्शित झाल्यानंतर आता या चर्चेला जास्त उधाण आलं आहे. मात्र अजूनही या दोघांनी आपल्या नात्याची माध्यमांसमोर जाहीर कबुली दिलेली नाही. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान रणवीर आपला सगळ्यात चांगला आणि जवळचा मित्र असल्याचे दीपिकाने सांगितले. कामाच्या बाबतीत मेहनती असली तरी भावनांचा विषय येतो तेव्हा आपण छोटय़ा-मोठय़ा गोष्टींवरून हळवे होतो, कित्येकदा मोडून पडायला होतं आणि मग पुन्हा नव्याने तयार व्हावं लागतं. पण, रणवीरसमोर या सगळ्या गोष्टी सहजतेने व्यक्त होतात. त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत नेहमी आपल्याबरोबर असतो, असं ती म्हणते. रणवीरने कधी दीपिकाबद्दलच्या भावना माध्यमांपासून लपवल्या नाहीत. दीपिकाचे आणि आपले नाते हे शब्दांपलीकडचे असल्याचे त्याने म्हटले आहे. कित्येकदा आम्ही दोघे इतके एकत्र का आहोत, याचा विचार केला पण आजवर उत्तर मिळू शकलेलं नाही. ते एक निर्मळ नातं आहे, असं त्याने म्हटलं होतं. दीपिकानेही त्याच्याबरोबरचं नातं हे अधिक खरं, सहज आणि निर्मळ असल्याचं सांगितलं.

पडद्यावर नायक म्हणून रणवीर आणि रणबीर या दोघांबरोबरची तिची जोडी हिट ठरली आहे. किंबहुना रणवीर आणि तिचे चित्रपट सर्वाधिक यशस्वी ठरले असले तरी एक चांगला सहकलाकार म्हणून विचार करायचा झाला तर ती पहिली पसंती रणबीर कपूरला देते. रणवीरचा विचित्र स्वभाव कधीकधी तिलाही गोंधळात टाकणाराच आहे, असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळेच दोन टोकाचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व असतानाही रणवीर आणि आपल्याला एकत्र आणून नायक-नायिका म्हणून भन्साळींनी कसं यशस्वी के लं याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटतं असं ती सांगते.

सध्या पद्मावतची यशोगाथा सगळीकडे सुरू असली तरी यातून बाहेर पडून दीपिका पुढच्या चित्रपटांच्या मागे लागली आहे. इरफान खान हा तिचा आवडता कलाकार असल्याचं तिने म्हटलं आहे. इरफानबरोबर तिचा पिकूही यशस्वी ठरला. आता त्याच्याबरोबर विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी चित्रपटात ती दिसणार आहे. मुंबईतलं एकेकाळचं दाऊदचं साम्राज्य आणि त्यात महत्त्वाची ठरलेली सपना दीदी हिच्यावर आधारित या चित्रपटात दीपिका पुन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय, एक्सएक्सएक्स चित्रपट मालिकेतील चौथ्या चित्रपटातही तिची वर्णी लागली असल्याने हॉलीवूडवारीसाठीही ती पुन्हा एकदा सज्ज होणार आहे.