अभिनेत्री दीपिका पादुकोन हिनं बॉलिवूडपुरता आपली ओळख मर्यादीत न ठेवता आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘xxx’ या हॉलिवूडपटात झळकल्यानंतर आता दीपिकाला मार्व्हल स्टुडिओच्या चित्रपटांतही झळकायचं आहे.

एका मुलाखतीत तिनं अॅव्हेंजर्स सीरिजचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात  मला सुपरहिरो चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे . मार्व्हलच्या चित्रपटात भारतीय सुपरहिरो साकारायला मला मनापासून आवडेल असं दीपिका म्हणाली.  लंडनमधल्या मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकाच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं, यावेळी दीपिकानं अॅव्हेंजर्स सीरिजचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली.

सध्या दीपिका ‘८३’ आणि ‘छपाक्’ या दोन चित्रपटात व्यग्र आहे. भारतानं १९८३ साली जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर ८३ हा चित्रपट आहे. तर आसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित ‘छपाक्’ हा चित्रपट आहे. ‘छपाक्’ चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.