बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोन ओळखली जाते. आता दीपिकानं अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रींना दिल्या जाणाऱ्या कमी मानधनावर ठोस भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. मानधनात कोणत्याही प्रकारची तडजोड यापुढे केली जाणार नाही असं स्पष्ट करत दीपिकानं नुकताच एक चित्रपट नाकारला आहे.

‘मला चित्रपटाची कथा खूपच आवडली. माझा चित्रपटाला होकारही होता मात्र अभिनेत्याच्या तुलनेत मला कमी मानधन दिल्यानं मी चित्रपट नाकारला . मला माझी किंमत ठावूक आहे’ असं नुकतंच दीपिकानं एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. ‘कोणत्या चित्रपटासाठी किती मानधन घ्यायचं हे मला ठावूक आहे. माझा अभिनय, माझं काम या सर्वांची कल्पना मला आहे. त्यामुळे मी माझ्या कामाला अनुसरूनच मानधन मागते. मानधनाच्या बाबतीत कोणतीच तडजोड मी यापुढे करणार नाही. कोणाला किती मानधन दिलं जातं याची कल्पना प्रत्येकाला असते मलाही आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो हेही मला ठावूक आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मी मानधन मागते. मात्र जर अभिनेत्याला जास्त मानधन द्यायचं आहे म्हणून तुम्हाला कमी मानधन देतोय असं जर मला कोणी सांगितलं तर मात्र मी हे खपवून घेणार नाही, तर मी मानधनाच्या बाबतीत कधीच तडजोड करणार नाही’ अशा शब्दात काही दिवसांपूर्वी दीपिकानं बॉलिवूडमधल्या मानधनाच्या तफावतीबद्दल आपली रोखठोक भूमिका मांडली होती.

‘पिकू’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘पद्मावत’, यांसारख्या यशस्वी चित्रपटात दीपिकानं काम केलं आहे. ‘पिकू’मध्ये तिला अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही अधिक मानधन दिलं गेल्याची चर्चा होती तर २०१८ मधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीही ती ठरली होती.