सूरतमधील राहुल राज या शॉपिंग मॉलमध्ये रांगोळी आर्टिस्ट करणने तब्बल ४८ तास लावून रांगोळी काढली होती. त्याच्या या मेहनतीचे काही समाजकंटकांनी अवघ्या काही मिनिटांतच होत्याचे नव्हते करून टाकले. दीपिकाने समाजकंटकांच्या अशा वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली. तिने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ट्विट केले होते. यानंतर गुरुवारी पोलिसांनी रांगोळीची नासधूस करणाऱ्या हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या १३ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. सुरतमध्ये ‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित केला तर त्याला विरोध केला जाईल असे, या संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी आधीच सांगितले होते.

करणची ४८ तासांची मेहनत काही मिनिटांत उधळताना या कार्यकर्त्यांना काहीच वाटले नाही. १०० लोकांच्या एका घोळक्याने ‘जय श्री राम’च्या घोषणा देत मॉलमध्ये प्रवेश केला आणि त्या रांगोळीची नासधूस केली. त्या लोकांचा आवाज ऐकून मॉलमध्ये उपस्थित असलेले लोक फार घाबरले. ‘पद्मावती’ सिनेमात राणी पद्मावतीची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली असल्याचा दावा करत हिंदू संघटना या सिनेमाला विरोध करत आहेत.

‘पद्मावती’ सिनेमाची घोषणा केल्यापासूनच त्यात काही ना काही अडथळे येत आहेत. राजस्थानमध्ये सिनेमाचे चित्रीकरण सुरु असताना राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर तोडफोड केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी संजय भन्साळी यांच्या कानशिलातही लगावली होती. त्यानंतर चित्रीकरणाची जागा बदलूनही पुन्हा करणी सेनेकडून दोनदा तोडफोड करण्यात आली. रणवीरने ‘पद्मावती’चे पोस्टर शेअर केल्यानंतरही त्याला धमकी देण्यात आली होती. आमचे सिनेमावर पूर्ण लक्ष असून, त्यात काही चुकीचे आढळल्यास आम्ही तुमच्या वाटेत पुन्हा अडथळे निर्माण करू, असे त्यांनी म्हटले. १ डिसेंबरला ‘पद्मावती’ सर्वत्र प्रदर्शित होईल.