बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी इटलीतील लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली. त्यानंतर बंगळुरु आणि मुंबई येथे ३ रिसेप्शनचे आयोजन केले आहे. त्यातील बंगळुरु येथील एक रिसेप्शन नुकतेच पार पडले. इतर दोन रिसेप्शन मुंबईत होणार आहेत. बंगळुरु येथे झालेल्या रिसेप्शनचे दीप-वीरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामध्ये दोघांनी केलेला शाही लूक पाहून सर्वांनीच या जोडीचे कौतुकही केले. त्यांचे फोटो आणि व्हिडियो व्हायरल झाले. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. त्यांचे काही मिम्सही सोशल मीडियावर वेगाने पसरले.

त्यानंतर आता एक स्पूफ व्हिडियोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर हँडलवरुन त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. रिसेप्शनमधील काही क्षण या व्हिडियोमध्ये देण्यात आले आहेत. मात्र त्याला काही संवादांची जोड देऊन हा व्हिडियो विनोदी बनवण्यात आला आहे. हे संवाद हिंदीतील असून ते मूळ व्हिडियोशी तंतोतंत मॅच करण्यात आले आहेत. दीपिका आणि रणवीर हे जिन्यावरुन खाली येत असल्यापासून ते स्टेजवरील त्यांचा वावर याला हे डायलॉग जोडण्यात आले आहेत. या व्हिडियोला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून हा व्हिडियो ६५ हजारहून अधिक जणांनी आतापर्यंत पाहिला आहे. तर २५०० जणांनी तो रिट्विट केला आहे.