कोल्हापूर येथे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या उभारण्यात आलेल्या सेटला मंगळवारी रात्री आग लावण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापुरातील मसई पठारावर सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. यासाठी सेट उभारण्यात आला आहे. मात्र, काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी याठिकाणी तोडफोड करत सेटची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणाचा तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये पद्मावमतीचे चित्रिकरण सुरू असताना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भन्साळी यांना मारहाण केली होती. त्यानंतर या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरमध्ये करण्याचा निर्णय झाला होता.

‘पद्मावती’ या चित्रपटातून भन्साळी एक ऐतिहासिक कथानक प्रेक्षकांसमोर सादर करण्याच्या तयारीत आहेत. पण, सिनेमॅटिक लिबर्टी घेत भन्साळींनी कथानकात काही बदल केले आहेत त्यामुळे राणी पद्मावतीची चुकीची प्रतिमा रंगवली जात असल्यामुळे या चित्रपटाला विरोध केला जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच सध्या भन्साळींचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. या चित्रपटाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी काही केल्या थांबण्याचे नावच घेत नाहीयेत. राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या चित्रपटाच्या सेटवर तोडफोड करत गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. तेव्हापासून चित्रपटाचे चित्रिकरण लांबणीवर पडले होते. या सर्व प्रकारानंतर चित्रिकरण पूर्वपदावर येत नाही तोच ‘पद्मावती’च्या कोल्हापूरातील सेटवरही याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्याचे पाहायला मिळत आहे.

unnamed-1
unnamed

गेल्या आठ दिवसांपासून भन्साळींच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण कोल्हापूरात सुरु होते. पण, काही अज्ञातांनी सेटवर तोडफोड केल्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटाच्या मार्गात अडथळा आला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरील सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी आणि अज्ञातांनी लावलेली आग विझवण्यासाठी स्थानिकांनी मदत केल्याचे कळत आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला विविध कारणांनी विरोध करण्यात येत आहे. राजा रावल रतन सिंग, अलाउद्दिन खिल्जी आणि राणी पद्मावती या ऐतिहासिक पात्रांभोवती ‘पद्मावती’ या चित्रपटाचे कथानक फिरणार आहे. त्यामुळे चित्रपटातील ऐतिहासिक पात्रांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप लावत भन्साळींविरोधात काहीजणांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे कोल्हापूरातील या सर्व प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे असाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करत आहे.