दीपिका आणि रणवीर सिंग यांचा शाही विवाहसोहळा गेल्या महिन्यात इटलीत पार पडला. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी जोडप्यानं मुंबईत संपूर्ण बॉलिवूडसाठी जंगी रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यासाठी अगदी कतरिनादेखील वैर विसरून उपस्थित राहिली होती. मात्र या सगळ्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मात्र कुठेही दिसले नाही. दीपिका ही काही वर्षांपूर्वी रणबीर कपूरला डेट करत होती हे बॉलिवूडमधल्या प्रत्येकालाच ठावूक होतं. मात्र रणबीरच्या आयुष्यात कतरिना आली आणि दीपिका रणबीरच्या नात्याला कायमचा पूर्णविराम मिळाला. आता रणबीर आलिया भट्टला डेट करत आहे. ही सारी नाती गुतांगुतीची असली तरी दीपिकानं नात्यातली कटुता मैत्रीत आणू दिली नाही. आजही दीपिका- आलिया, रणबीर-रणवीर हे चांगले मित्र आहे. लग्नापूर्वी या चौघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र दीपिकाला माध्यमांसमोर लग्नासाठी शुभेच्छा देणारे रणबीर- आलिया हे जोडपं रिसेप्शन पार्टीत कुठेही दिसलं नाही. याबद्दल दीपिकाला नुकतंच एका अवॉर्ड शोदरम्यान विचारलं होतं त्यावेळी रणबीर माझ्या पार्टीला आला नाही याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही असं ती म्हणाली. रणबीर आणि माझं रिसेप्शनच्या आधी बोलणं झालं होतं नंतर मात्र बोलणं झालं नाही असंही दीपिका म्हणाली. आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यानं ते दोघंही रिसेप्शनला उपस्थित राहू शकले नाही असं समजत आहे.