दीपिका आणि विराट या देशातील दोन तरुण, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा समावेश ‘टाइम’च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत झाला आहे. दीपिकानं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे आहे. मानसिक आजार त्यातून येणारं नैराश्य यावरही तिनं खुलेपणानं भाष्य केलं आहे. तर दमदार खेळीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं क्रिकेट विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या नावाबरोबरच ओला कॅबचे सहसंस्थापक भावीश अगरवाल, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्याही नावांचा समावेश आहे.

‘दीपिका ही फक्त एक सेलिब्रिटी नाही तर ती एक मेहनती कलाकार आहे. ती आपला जीव ओतून एखादी कलाकृती सादर करते’ असं कौतुक वीन डिझेलनं केलं आहे. वीन सोबत दीपिकानं ‘xXx: Return of Xander Cage’ या चित्रपटात काम केलं होतं. दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट होता. यानिमित्तानं जगभरातून तिच्या कामाचं कौतुक झालं होतं. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ सिनेमातली दीपिकाची राणी पद्मावतीची भूमिकाही कौतुकास्पद होती. दीपिकानं फक्त अभिनयच नाही तर नैराश्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर खुलेपणानं समोर येऊन चर्चा केली. २०१८ च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत समाविष्ट झालेली दीपिका ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये या यादीत प्रियांका चोप्राचा सहभाग होता.

https://www.instagram.com/p/BhxCF-bhj0q/

या यादीत विराटचाही सहभाग आहे. खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरनं विराटचं याबद्दल अभिनंदन केलं आहे. ‘वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतल्यानंतर विराटवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण तो या चुकांमधून शिकला. त्यानं आपल्या खेळात बरीच प्रगती केली आहे.’ असं कौतुक सचिननं केलं आहे. विराट, दीपिका सोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रिंस मोहम्मद बिन सलमान, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या नावाचा सहभाग आहे.पण ,या यादीत मोदींचं नाव मात्र नाही आहे.