काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर एक सिनेमा येण्याची शक्यता आहे. सध्या हिंदी सिनेसृष्टीत बायोपिक, थ्रिलर आणि ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेन्ड आला आहे. त्याच ट्रेन्डचा विचार करता सुनंदा पुष्कर यांच्या हत्याकांडावर एक सिनेमा येण्याची शक्यता आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी म्हणजेच सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा आहे. लवकरच तिच्याशी चर्चा केली जाईल असे दिग्दर्शक शिवमने म्हटले आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार ‘अंधाधुन’ या सिनेमाचा दिग्दर्शक श्रीराम राघवन याचा सहाय्यक म्हणून काम केलेला शिवम नायर हा सिनेमा आणतो आहे. हा सिनेमा म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. ‘आहिस्ता आहिस्ता’ या सिनेमाचं दिग्दर्शनही शिवम नायरने केलं आहे.

याशिवाय ‘नाम शबाना’ या सिनेमाचं दिग्दर्शनही शिवमने केलं आहे. नीरज पांडे आणि शिवम नायर हे दोघेही या सिनेमाची निर्मिती करणार आहेत अशीही माहिती समोर येते आहे. या संदर्भातला रिसर्च दीड वर्षांपासून सुरु होता जो आता पूर्ण झाला आहे. काही वर्षांपूर्वीच सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील एका फाइव्हस्टार हॉटेलमध्ये सापडला होता. याच हत्याकांडावर हा सिनेमा येणार आहे. सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला विचारले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदा पुष्कर यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र शशी थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर काही वर्षातच सुनंदा पुष्कर यांची हत्या करण्यात आली. सध्या सुनंदा पुष्कर यांच्या खुनाचा खटला दिल्लीतील न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणात शशी थरूर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हे एक गूढ होतं याच गुढाभोवती सिनेमाची कहाणी फिरणार असल्याचे समजते आहे. शशी थरूर यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या सिनेमाचे नाव काय असेल हेदेखील अद्याप समजलेले नाही.