‘पद्मावत’ अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असते. तिला चर्चेत येण्यासाठी फार काही करावे लागत नाही. तिचे सिनेमे आणि तिची खासगी आयुष्यच अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. पण नुकतीच दीपिका तिच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. एका टीव्ही शोच्या मुलाखतीदरम्यान दीपिकाला ती तिच्या लग्नात कोणाला आमंत्रित करणार हा प्रश्न विचारला असता दीपिका तिच्या लग्नात कतरिना कैफला आमंत्रण देणार नसल्याचे म्हणाली. दीपिका या टीव्ही शोमध्ये बहीण अनीशासोबत आली होती.

दीपिका आणि कतरिनामध्ये बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरमुळे नेहमीच शीतयुद्ध सुरू होते. कतरिनामुळेच रणबीर आणि दीपिकाचे नाते तुटले. ब्रेकअपला एवढी वर्ष होऊनही दीपिकाच्या मनातील कतरिनासाठीचा द्वेष तसूभरही कमी झाला नाही. नेहा धुपियाच्या बीएफएफ विथ वोग्ज या शोमध्ये ती गेली होती. या कार्यक्रमात तिने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. कतरिनाला तू तुझ्या लग्नात बोलावणार का या नेहाच्या प्रश्नावर क्षणाचाही विचार न करता दीपिकाने त्वरीत नाही असे उत्तर दिले. दीपिकाच्या या उत्तराने नेहालाही आश्चर्याचा धक्का बसला.

गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चा जोर धरत आहेत. या शोमध्ये नेहाने दीपिकाला रणवीरसोबतच्या नात्याविषयी अनेक प्रश्न विचारले. तू रिलेशनशिपमध्ये आहेस का या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिका म्हणाली की, मी रिलेशनशिपमध्ये नाही आणि सध्या तसा कोणताही विचार नाही. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमात दीपिकाने राणी पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेसाठी तिचे फार कौतुकही केले जात आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.