गेले काही दिवस सातत्याने बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच हॉलीवूडमध्ये दिसणार या चर्चेने जोर धरला होता. काही दिवसांपूर्वी हॉलीवूड अभिनेता व्हीन डिझेलसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबरोबरचे दीपिकाचे छायाचित्र समाजमाध्यमातून फिरू लागल्याने या गोष्टीवर जणू शिक्कामोर्तब झाले होते, मात्र हॉलीवूडच काय तर ‘बाजीराव मस्तानी’नंतर बॉलीवूडपटासाठीही करार केला नसल्याचे दीपिकाने स्पष्ट केले.
दीपिका हॉलीवूड अभिनेता व्हिन डिझेलबरोबर ‘फास्ट अँड फ्यूरिअस’च्या सातव्या आवृत्तीत काम करणार, अशी चर्चा गेल्या वर्षीपासून होत होती. या वर्षी सातवी आवृत्ती प्रदर्शित झाली, मात्र त्यात दीपिका कुठेही नव्हती. आता व्हिनबरोबरच त्याच्या दुसऱ्या चित्रपटात ती काम करणार असल्याचे बोलले जात होते. गेल्या आठवडय़ात ‘इन्स्टाग्राम’वर व्हिन डिझेलसारख्या दिसणाऱ्या पाठमोऱ्या उभ्या व्यक्तीबरोबरचे दीपिकाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि तिची हॉलीवूडवारी पक्की झाल्याची खबर कानोकानी झाली. मी हॉलीवूडपट करत असल्याची माहितीही मला इतरांकडूनच मिळाली असल्याचे दीपिकाने गमतीने सांगितले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांमध्ये दीपिका सध्या व्यग्र आहे. ‘या वर्षभरात मी तीन वेगवेगळे चित्रपट केले आहेत. या तिन्ही चित्रपटांतील माझ्या व्यक्तिरेखा पूर्णपणे भिन्न होत्या आणि चाकोरीबाहेरच्या होत्या. प्रत्येक भूमिकेसाठी मला फार मेहनत घ्यावी लागली असून एकापाठोपाठ एक चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विश्रांतीची मला जास्त गरज आहे’, असे दीपिकाने स्पष्ट केले.
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटानंतर मी कोणत्याही हिंदी चित्रपटासाठीसुद्धा करार केलेला नाही. तर हॉलीवूडपट ही फार दूरची गोष्ट असल्याचे दीपिकाने सांगितले. दीपिकाच्या ‘इन्स्टाग्राम’वर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रावरून अक्षय कुमारनेही तिची खिल्ली उडवणारे त्याच धर्तीचे छायाचित्र स्वत:च्या ‘इन्स्टाग्राम’वरून प्रसिद्ध केले होते. व्हिन डिझेलबरोबर प्रसिद्ध झालेले छायाचित्र हेसुद्धा अशाच प्रकारे जोडण्यात आले होते, असे तिने सांगितले. हॉलीवूडपटात काम करण्याची इच्छा आहे. अगदी बाँडपटासाठीही विचारणा झाली तरी आपली काम करण्याची तयारी आहे, मात्र बाँडपटातही नायिका म्हणून काही एक भूमिका वाटय़ाला येणार की नाही, याची खातरजमा करूनच त्या पद्धतीने चित्रपट स्वीकारेन, असे दीपिकाने सांगितले. तूर्तास तरी ‘बाजीराव मस्तानी’नंतर मोठी सुट्टी घेऊन आराम करण्याचा आपला विचार असल्याचे स्पष्ट करत हॉलीवूडवारीच्या चर्चेला दीपिकाने पूर्णविराम दिला आहे.