वीजचोरीवर भाष्य करणारा ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला. देशातल्या वीजचोरीसारख्या मुद्द्यावर भाष्य करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. यामध्ये शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून नुकतचं या चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं आहे.

मैत्रीच्या नात्यातून दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांनी देशातील वीजचोरीचा प्रश्न मांडला असून या चित्रपटातील ‘देखते देखते’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला आतिफ अस्लम यांचा सुमधूर आवाज मिळाला असून या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळत आहे.

‘देखते देखते’ प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दोन दिवसांमध्ये १ कोटी ८० लाखापेक्षा अधिक वेळा हे गाणं युट्युबवर पाहिलं गेलं आहे. त्यामुळे सध्या युट्युबच्या ट्रेंडमध्ये ते तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.

दरम्यान, या गाण्यामध्ये शाहिद आणि श्रद्धा रोमॅण्टीक अंदाजामध्ये दिसत असून प्रेमातील गोडवा, रुसवे-फुगवे या गाण्यात रंगविण्यात आले आहेत. त्यातच गाण्याचे लिरिक्स मनोज मुस्तिसर यांनी तयार केले आहे. भूषण कुमार प्रस्तुत  हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यात  शाहिद, श्रद्धासोबतच यामध्ये सुधीर पांडे, सुप्रिया पिळगावकर, यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत.