अकाली दलाच्या एका आमदाराने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानविरोधात खटला दाखल केल्याचे वृत्त आहे. शाहरुखचा ‘झिरो’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमामध्ये शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या आमदाराने शाहरुख खानसह सिनेमासंबंधी इतर लोकांवर पंजाबमधील कोर्टात हा खटला दाखल केला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमधील अकाली दलाचे आमदार मंजिंदर सिंग सिरसा यांनी येथील कोर्टात शाहरुख खान आणि इतरांवर फौजदारी खटला दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी ‘झिरो’ या सिनेमात शीख समाजावर कोटी करण्यात आल्याचा सिंग यांचा आरोप आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या सिनेमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शाहरुखच्या वाढदिवशीच त्याच्या बहुप्रतिक्षीत ‘झीरो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘झीरो’मधला स्वत:चा पहिला लूक शाहरुखने टीझरच्या रुपात काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित केला होता. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. आनंद राय दिग्दर्शित ‘झीरो’ या चित्रपटात झीरोचा हिरोपर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.