टेलिव्हीजन वाहिन्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. यंदा बिग बॉसच्या १० व्या पर्वामध्ये चांगलाच ड्रामा पाहायला मिळत आहे. वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून नावाजलेल्या या कार्यक्रमामध्ये काही सर्वसामान्य स्पर्धक सेलिब्रिटींना चांगलीच टक्कर देत आहेत. पण असे असतानाच बिग बॉसच्या घरातील बहुचर्चित स्पर्धक स्वामी ओमजी महाराज यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस या वादग्रस्त घरात दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वत:ला संन्यासी म्हणवणारे स्वामी ओमजी सध्या बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक म्हणून राहात आहेत. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच दर दिवशी स्वामी ओम आणि त्यांच्याशी निगडीत विविध चर्चांना उधाण येतच असते. त्यातच आता आणखीन भर पडली आहे. चोरीच्या आरोपाखाली स्वामीजींना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बिग बॉसचे घर गाठले आहे. स्वामीजींना अटक करण्यासाठी पोलीस बिग बॉसच्या घरात दाखल झाले असले तरीही स्वघोषित स्वामी ओमजी यांनी मात्र घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी काही कागदपत्रांवर स्वामीजींची स्वाक्षरी घेतल्याची माहिती देखील मिळाली आहे.

वाचा: अश्लील संदेश पाठवणा-या एजाजला अटक; ऐश्वर्याकडून गुन्हा दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी ओमजी यांच्यावर त्यांच्याच भावाच्या दुकानात चोरी करण्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्यावर अश्लील वर्तणुकीचेही आळ घेण्यात आले आहेत. त्यामुळे विविध कारणांनी चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या स्वामीजींवर यापुढे काय कारवाई होणार याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रिअॅलिटी शो च्या एका वेगळ्याच धाटणीमुळे सध्या बिग बॉसचे १०वे पर्व चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी हजेरी लावली आहे. येत्या काही भागांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टही तिच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बॉसच्या मंचावर दिसणार आहे.