करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अलिकडेच त्याने गरीब विद्यार्थांसाठी एका स्कॉलरशिपची घोषणा केली होती. त्यानंतर आता तो एका तरुणीला पोलीस प्रशासनात भरती होण्यासाठी मदत करत आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

दिल्लीमधील एका तरुणीला पोलीस प्रशासनात भरती होण्याची इच्छा आहे. त्यासाठी ती जीवतोड मेहनतही करत आहे. या तरुणीने दिल्ली पोलीस-२० चा फॉर्म भरला आहे. परंतु परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी तिच्याकडे पुस्तकं नाहीत. शिवाय आर्थिक टंचाईमुळे ती कोचिंग क्लासमध्ये देखील जाऊ शकत नाही. या तरुणीला सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. “तुमच्या कोचिंग क्लासेसची व्यवस्था झाली आहे. प्रशिक्षण घेऊन एक चांगली पोलीस हो आणि देशाची सेवा कर. जय हिंद.” अशा आशयाचं ट्विट करुन या तरुणीला सोनूने अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य ड्रग्जमध्ये”; अभिनेत्याने उडवली दीपिकाची खिल्ली

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.