देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. या कठीण काळात लोकांची मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. अभिनेता सोनू सूद, सलमान खान तर छोट्या पडद्यावरील गुरमीत चौधरी हे कलाकार गरजूंसाठी देवदूतासारखे धावून आले आहेत. तर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील गुरुद्वारा रकाब गंज साहिब, यांनी सुरु केलेल्या श्री गुरु तेग बहादुर कोव्हिड केअर सेंटरसाठी दोन कोटी रुपये दान केले होते. आता उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सरदार परमिंदर सिंग यांनी अमिताभ यांच्यावर टीका केली आहे.

परमिंदर सिंग यांनी दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि त्याचे अध्यक्ष सरदार मनजिंदरसिंग सिरसा यांना तत्काळ देणगी परत करण्यास सांगितले आहे. “अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिल्ली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला करोना लढाईसाठी २ कोटी रुपयांची मदत केल्याचे सांगण्यात येतं आहे. तिसऱ्या गुरुंच्या वेळी सम्राट अकबरलाही त्यांना बरीच जागा आणि गावं द्यायची होती. पण तिसऱ्या गुरुंनी ते स्वीकारले नाही कारण ती अकबरची संपत्ती नव्हती,” असे परमिंदर सिंग म्हणाले.

पुढे अमिताभ यांच्याबद्दल ते म्हणाले, “हे तेच अमिताभ बच्चन आहेत, ज्यांनी १९८४ मध्ये शीख दंगलीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख लोकांविराधोत दंगली भडकावल्या, अशा व्यक्तीकडून देणगी घेतल्यास शीख समाजासाठी हे श्रेयस्कर नसेल आणि त्यांच्या मुल्यांच्या विरोधातही असेल.”

आणखी वाचा : “तेव्हा मी झोपलो होतो म्हणून गैरसमज झाला…”,निधनाच्या बातमीवर परेश रावल यांचं स्पष्टीकरण

पुढे ते म्हणाले, “शीख समाजात पैशांची कमतरता नाही. आम्ही प्रत्येक घरासमोर जाऊ आणि हात जोडून पैसे मागू, म्हणून अशा प्रकारचे दान त्वरित परत करा. मला अशी विनंती करायची आहे की जर माणुसकीच्या विरोधात काम करणारी कोणतीही व्यक्ती असेल तर गुरुंच्या घरात त्याचा रुपयासुद्धा घेऊ नये.”

दरम्यान, या आधी दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि त्याचे अध्यक्ष सरदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी ट्विट करत अमिताभ यांच्या मदतीबद्दल सांगितले होते. “शीख महान आहेत, शीखांच्या सेवेला सलाम…असे अमिताभ बच्चन जी म्हणाले जेव्हा त्यांनी श्री गुरु तेग बहादुर या कोविड केअर सुविधेसाठी २ कोटींचे योगदान दिले. दिल्ली ऑक्सिजनसाठी झगडत आहे, सुविधेच्यासाठ्या बद्दल अमिताभ जी रोज फओन करुन मला विचारतातचे,” असे ट्वीट मनजिंदरसिंग यांनी केले होते.