बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान यानं नुकतंच त्याच्या घरी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचं आयोजन केलं होतं. लहान मुलगा अबराम सोबत मिळून त्यानं दहीहंडी फोडत या सणांचा आनंद लुटला. पण, शाहरुखच्या आनंदावर विरजण पडलं आहे कारण उत्तरप्रदेशमधल्या देवबंद येथील उलेमांनी शाहरूखच्या दहीहंडी आयोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इतर धर्मियांचे सण साजरा करण्याची सक्त मनाई इस्लाम धर्मात आहे. दुसऱ्या धर्मातील सण उत्सवात मुस्लिम व्यक्तीनं सहभाग घेणं  ही वेगळी गोष्ट आहे मात्र गैर मुस्लिम सण स्वत:च्या घरात साजरे करणे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा कृत्यामुळे माणूस इस्लामपासून दूर होतो असं सांगत उलेमांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

त्याप्रमाणे इस्लाम धर्माचे जो नियम मोडतो अशा व्यक्तीला धर्मातून बहिष्कृत केले जाते असा धमकीवजा इशारा पत्रकार परिषदेत त्यांनी दिला आहे. शाहरुख हा कलाकार आहे आणि कलाकाराचा कोणताही धर्म नसतो पण इतर धर्मांचे सण घरी साजरे करताना शाहरूखनं भान ठेवायला हवं होतं असं ‘फतवा ऑन मोबाइल सर्विस’चे अध्यक्ष मुफ्ती अरशद फारूकी यांनी म्हटलं आहे.