जयदेव भाटवडेकर – response.lokprabha@expressindia.com

रॉक बॅण्ड
केवळ पाश्चात्त्य संगीत आणि बॅण्ड ऐकत न बसता अनेक तरुणांनी आपल्या देशातच रॉक बॅण्डची सुरुवात केली. पाश्चात्त्य संगीताला देशी भाषांचा साज चढवला. त्यातूनच पुढे  रॅप, हिपहॉपलादेखील आपलेसे केले. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटाच्या निमित्ताने देशभरातील काही भाषिक बॅण्डबद्दल…

संगीताला सीमारेषा नसते. ते संपूर्ण विश्वालाच व्यापून टाकते. संगीताचे चाहते सर्वत्र असतात. याचे अगदी पुरेपूर प्रत्यंतर भारतीयांच्या विविध रॉकबॅण्ड्सकडे पाहिल्यावर लक्षात येते. देशात अनेक वर्षांपासून निरनिराळे बॅण्ड आणि कलाकार स्वतच्या अशा विशिष्ट शैलीने रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. तरुण पिढय़ांमध्ये पाश्चात्त्य संगीताचे वेगळे आकर्षण नेहमीच राहिले आहे. ‘बीटल्स’सारखा अजरामर बॅण्ड विसाव्या शतकातील तरुणांना नेहमीच लक्षात राहील तर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘लिन्कीन पार्क’ आणि ‘कोल्डप्ले’सारख्या बॅण्ड्सनी छाप पाडली आहे. याशिवाय रॅप या हिपहॉपचाच भाग असणाऱ्या नवीन पाश्चात्त्य संगीताच्या प्रकाराने तरुण पिढीचे लक्ष वेधून घेतले आहे. रॉक बॅण्ड आणि रॅप हे दोन्ही प्रकार पाश्चात्त्य देशात उदयास आले असले तरी अनेक भारतीय कलाकारांनी या संगीताच्या प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवून जागतिक ख्यातीदेखील मिळवली आहे. इतकेच नाही तर इंग्रजीतून सादर होणाऱ्या रॉक, रॅप आणि हिपहॉपला अस्सल देशी भाषांमध्ये उतरवले आहे.

‘परिक्रमा’ हा भारतातील सगळ्यात जुन्या बॅण्डपकी एक. मूळचा दिल्लीचा हा रॉक बॅण्ड १९९१ मध्ये सुरूझाला. या बॅण्डचा भारतीयांमध्ये रॉकबॅण्डची सुरुवात करण्यामध्ये, ती संस्कृती रुजवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. नितीन मलिक हा या बॅण्डचा मूळ गायक आहे. सुबीर मलिक, गौरव बलानी, श्रीजन महाजन यांनी काही अन्य साथीदारांबरोबर या बॅण्डने अनेक गाणी सादर केली आहेत. या बॅण्डचे पहिले गीत ‘झेरॉक्स’ हे  ‘भारतीय रॉक संगीताचा चेहरा’ या नावाने संबोधले जाते. जवळपास २७ वर्षांच्या कारकीर्दीत या बॅण्डने ‘ओपन स्काईज’, ‘बट इट रेन’सारखी अनेक प्रसिद्ध गाणी दिली आहेत आणि आजही देत आहेत. तबला, मृदंगमसारख्या वाद्यांचा पाश्चिमात्य वाद्यांशी संगम करून या बॅण्डने फ्युजन रॉकची शैली भारतात रुजवली.

‘परिक्रमा’ या बॅण्डबरोबरच भारताच्या इतर भागांमध्येही नवे नवे बॅण्ड उदयास आले. ९०च्या दशकातच ‘फॉसिल्स’ हा बॅण्ड जन्माला आला. हा बॅण्ड मूळचा कोलकात्यामधील आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये रॉक संगीत तसेच बांगला रॉकची पायाभरणी या बॅण्डने केली. १९९८ मध्ये रूपम इस्लाम आणि दीप घोष या दोघांनी काही कलाकारांना हाताला धरून हा बॅण्ड उभा केला. ‘फॉसिल्स’, ‘फॉसिल्स २’, ‘मिशन एफ’ हे काही सुरुवातीचे अल्बम या बॅण्डला यशाच्या शिखराकडे घेऊन गेले. ‘एका नौओ’ हे एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी खास गायलेले गीत अत्यंत प्रसिद्ध झाले. या बॅण्डने अनेक वेळा बांगलादेशाचे दौरे केले आहेत. २०१२ साली ‘फॉसिल्स’ने अमेरिकेत लास वेगास येथे काही गाणी सादर केली, या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.

१९९२ मध्ये आणखी एक प्रसिद्ध बंगाली रॉक बॅण्ड उदयास आला तो म्हणजे ‘कॅक्ट्स’. या बॅण्डनेदेखील बंगाली रॉक म्युझिकला वेगळ्या स्तरावर नेले. फक्त भारतच नाही तर परदेशांमध्येदेखील ‘कॅक्टस’ने लोकांना भारून टाकले. आजपर्यंत त्यांनी हजारोंवर कार्यक्रम केलेले आहेत आणि आजदेखील हा बॅण्ड तितकाच कार्यरत आहे.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत भारताच्या इतर भागांमधूनदेखील अनेक रॉक बॅण्ड निर्माण झाले. दक्षिणेतील अनेक रॉक बॅण्ड आज तरुणांच्या चच्रेत असतात. १९९६ मध्ये ‘मदरजेन’ हा बॅण्ड कोचीमध्ये रॉक संगीत घेऊन अवतरला. जॉन थॉमस आणि क्लाइड रोझारिओ हे या बॅण्डबरोबर स्थापनेपासून जोडलेले आहेत. ‘ब्रोकन’, ‘चेसिंग द सन’, ‘फिल्डस ऑफ साऊंड’ ही काही प्रसिद्ध गाणी या बॅण्डने सादर केली आहेत. केरळमध्ये ‘एविअल’ नामक आणखी एक बॅण्ड २००३ मध्ये मल्याळी रॉक संगीत घेऊन आला. हा बॅण्ड त्यांच्या मल्याळी गीतांसाठी प्रचंड प्रसिद्ध झाला. केरळमधील त्या काळी कार्यरत असणाऱ्या रॉक बॅण्डमुळे प्रेरित झालेला या बॅण्डने रॉक संगीतासाठी भाषा अडथळा ठरत नाही हे सिद्ध केले. ‘थाईकुद्दम ब्रिज’ हा आत्ताच्या तरुणांमध्ये प्रसिद्ध बॅण्ड आहे. २०१३ साली हा बॅण्ड कार्यरत झाला आणि थोडय़ाच दिवसांत प्रसिद्ध झाला. कप्पा टीव्हीवरील कार्यक्रमातून या बॅण्डने भारतभर आपल्या संगीत शैलीची झलक रसिकांना दाखवली. बेंगलोरमध्ये २००३ साली जन्माला आलेल्या ‘आगम’ या बॅण्डने शास्त्रीय आणि रॉक या दोन संगीत शैलींचा मेळ घालून अनोख्या फ्युजनला जन्म दिला. कोक स्टुडियोसारख्या भारदस्त माध्यमातून या बॅण्डच्या रसिकांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुंबईमध्येदेखील ‘कोशिश’ आणि ‘शा-इर + फंक’ या दोन्ही बॅण्डचा उगम २००६ आणि २००५ मध्ये झाला. ‘कोशिश’ या बॅण्डने िहदी भाषेत रॉक गाणी प्रसिद्ध केली. आसाममधील ‘शेड्स ऑफ र्रिटीब्युशन’ हा बॅण्डदेखील भारतात अनेकांच्या ओळखीतला आहे. मुख्यत आसाममध्ये या बॅण्डचे प्रचंड चाहते आहेत. असामी भाषेतील रॉक संगीत सादर करताना हा बॅण्ड त्यांच्या गाण्यांद्वारे आसाममधील लोकांचे जीवन, त्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे आणि सामाजिक समस्याचे वर्णन करतो. मेघालयमधील रुडी आणि तीप्रिती यांचा ‘सोलमेट’ हा बॅण्डदेखील उत्तर-पूर्व भारतात प्रसिद्ध आहे.

हे सगळे बॅण्ड आणि त्यांची जन्मभूमी लक्षात घेता रॉक बॅण्डचे वेड भारताच्या प्रत्येक भागात पसरलेले आहे हेच दिसून येते. आंतरराष्ट्रीय बॅण्डच्या व्याप्तीपुढे देशी बॅण्ड कदाचित थोडेसे कमी पडत असले तरीही भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे रॉक बॅण्ड हेच दर्शवतात की, या देशामध्ये कलाकारांची कमतरता नाही. भारतातील विविध भाषिक बॅण्ड्ना आपापल्या राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि काही बॅण्ड सातासमुद्रापार कार्यक्रम करत आहेत. पाश्चात्त्य वाद्यांचे आणि संगीत प्रकारांचे वाढते आकर्षण पाहता येत्या काळात अजून नवे बॅण्ड जन्माला येतील अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.

भारतातील तरुण पिढीला जसे रॉकचे वेड लागले तसेच पाश्चात्त्य रॅपचे वेड लागण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. पाश्चात्त्य संगीतात रॅप हा प्रकार १९७० च्या दशकात उदयास आला. यमक जुळणारे शब्द एका ठरावीक लयीत ऱ्हिदम आणि बिट्सबरोबर योग्य मेळ घालून तयार केलेल्या या हिपहॉप शैलीतील प्रकाराला रॅप असे म्हटले जाते. रॅपमध्ये सूर आणि पारंपरिक वाद्यांना फारसे महत्त्व नसते. त्यामुळे संगीत रसिकांमध्ये नेहमीच रॅप या शैलीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला येतात. पण या रॅपने २१व्या शतकातील तरुण पिढीला झपाटले आहे. भारतामध्ये एमिनेम, जय-झी, विझ खलिफा या काही आंतरराष्ट्रीय रॅपर्स (रॅप कलाकारांचे) अनेक चाहते आहेत. कॉलेजमध्ये कार्यक्रमात किंवा पाटर्य़ामध्ये रॅपचा वापर आजकाल बरेचदा दिसून येतो.

भारतामध्येही रॅप संगीतशैलीची मुळे रुजायला लागलेली आहेत. काही दिवसांपूर्वी भारतातील प्रत्येक तरुणाच्या तोंडावर एकच नाव असायचे, यो यो हनी सिंग. त्याच्या ‘ब्लू आईज’ या रॅप गाण्याने बॉलीवूड संगीत क्षेत्रात खूप खळबळ उडवली. ‘चार बोतल व्होडका’ हे त्याचे अजून एक हिट रॅप. त्याच्या या दोन्ही रॅपना मिळालेला प्रतिसाद बघता अनेक सिनेमांमध्ये रॅपचा वापर केला जाऊ लागला. इतकेच नाही तर अनेक तरुण स्वत रॅप लिहण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. रॅप सादर करण्याच्या स्पर्धादेखील कॉलेजमध्ये होऊ लागल्या. ‘रफ्तार’ या नावाने प्रसिद्ध असणारा दलीन नायर हा भारतीय रॅपमधील आणखी एक दिग्गज. ‘रफ्तार’ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. मूळचा केरळचा असणारा हा रॅपर तरुणाईला वेड लावत आहे. याचबरोबर बॉलीवूड सिनेमांमध्ये ‘बादशाह’ने देखील काही प्रसिद्ध रॅप गायली आहेत. ‘हार्ड कौर’ ही ब्रिटिश-भारतीय महिला रॅपर बॉलीवूड तसेच कोक स्टुडियोच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. आज यू-टय़ुब आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटवर अनेक तरुण आपल्या स्वतच्या रॅपचे व्हिडीओ अपलोड करत असतात. यातूनच तरुण पिढीतील वाढते रॅपचे वेड सिद्ध होते.

भारतातील तरुण पिढीचे रॅप किंवा रॉक बॅण्डचे वेड लक्षात घेऊन काही बॉलीवूड सिनेमांमध्येदेखील याचा समावेश होताना दिसतो. ‘रॉकस्टार’ या सिनेमात पाश्चात्त्य वाद्यांचा वापर करून रॉक संगीताचा उत्तम नजराणा दिलेला दिसून येतो. १४ फेब्रुवारीला प्रदíशत झालेला ‘गली बॉय’ हा सिनेमा हिपहॉप संगीत, गरीब तरुण अशा कथानकावर आधारित आहे. परिस्थितीला जिद्दीने तोंड देत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या मुंबईतील एका छोटय़ाशा कोपऱ्यात राहणाऱ्या मुरादची कथा जाणून घेण्यासाठी तरुण पिढी उत्सुक आहे. या सिनेमातील काही गाण्यांना तुफान लोकप्रियता मिळाली आहे. एकंदरीतच तरुणाईची नावीन्याची ओढ, पाश्चात्त्य संगीताचा पगडा, यातून तयार झालेले हे रॉकबॅण्ड, हिपहॉप यांनी केवळ पाश्चात्त्यांचे अनुकरण केलेले नाही, तर स्वत:ची एक स्वतंत्र प्रतिमा तयार केली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
सौजन्य – लोकप्रभा