सुहास जोशी

प्रभारी म्हणजे एखाद्या पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारी व्यक्ती. त्या पदावर कोणाचीच नेमणूक नाही म्हणून काम रखडू नये हा त्यामागचा मूळ उद्देश. तो प्रभारी के वळ नगाला नग इतक्याच संकु चित मानसिकतेचा असेल तर जागा भरणे अशीच व्यवस्था निर्माण होते. पण त्याऐवजी काही वेगळा विचार करून यंत्रणा पुढे नेणारी व्यक्ती असेल तर प्रभारीदेखील प्रभावी ठरतो. अर्थात हे सर्व तितक्याच सहजपणे पडद्यावर उमटणेदेखील महत्त्वाचे असते. आणि हा प्रभारी जर अमेरिकेचा अध्यक्ष असेल तर त्या मांडणीचा आणखीनच कस लागतो. नेटफ्लिक्सवरील ‘डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर’ ही मालिका पाहताना प्रभारीचे प्रभावीपण सर्वच अंगाने दिसून येते.

भली मोठी अशा तीन सीझनमध्ये ५३ भागांत विस्तारलेली ही मालिका आहे. सुरुवातीचे दोन सीझन हे अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीद्वारे दूरचित्रवाणीवर प्रसारित झाले, तर शेवटचा सीझन केवळ नेटफ्लिक्सवर. अमेरिकेचे अध्यक्ष, संपूर्ण मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्थेतील उच्चपदस्थ काही कार्यक्रमासाठी एकत्र येतात तेव्हा घातपाताने ते सर्वच मृत्युमुखी पडले तर देश कोणी आणि कसा चालवायचा?,  हा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. यावर उपाय म्हणून ‘डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर’ ही व्यवस्था कार्यरत करते. डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर म्हणून ज्याचे नाव आधीपासूनच नोंदवले असेल तो अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतो अशी या मालिकेची मूळ संकल्पना. ही संकल्पना काल्पनिक की वास्तव हा मुद्दा येथेच सोडून देऊ.

मालिकेच्या पहिल्याच काही मिनिटांत अमेरिके तील कॅपिटॉल इमारतीत अध्यक्षांच्या वार्षिक संबोधनादरम्यान बॉम्बस्फोट होतो आणि एका फटक्यात सर्व महत्त्वाची माणसे मारली जातात. त्यावेळी गृहनिर्माण खात्यातील सचिव टॉम क्रिकमन याचे नाव डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर म्हणून नोंदवलेले असते. मूळ प्राध्यापक असलेल्या टॉम काही महिन्यांपूर्वीच गृहनिर्माण खात्यात रुजू झालेला असतो. त्याला राजकारणात फारशी गती नसते, पण उद्भवलेल्या परिस्थितीत दुसरा पर्यायदेखील नसतो. या घटनेनंतर एकापाठोपाठ एक अनेक घटनांची मालिकाच सुरू होते आणि त्याचा पट जसजसा विस्तारत जातो तसे हे कथानक फुलू लागते. एकीकडे टॉम क्रिकमनची काहीशी अडखळत सुरू असलेली वाटचाल आणि त्याच वेळी त्याची स्वतंत्र कार्यशैली यामुळे निर्माण होणारे आणखीन अडथळे अशी गुंतागुंत चांगलीच वाढते.

बॉम्बस्फोट कोणी केला हे शोधणे, घरभेदींना उघडे पाडणे, अंतर्गत यंत्रणा मजबूत करणे, नवीन लोकप्रतिनिधींची निवडणूक घेणे, राज्यशकट हाकण्यासाठीच्या रोजच्या बाबी सांभाळणे, अंतर्गत राजकारण आणि त्याच वेळी बाह्य़शक्तींशी लढणे, आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान टिकवणे आणि या सर्वावर प्रसिद्धीमाध्यमांतून सुरू असणाऱ्या वार्ताकनातून मार्ग काढत पुढे जाणे अशी तारेवरची कसरत असणारा भला मोठा पट या मालिकेत मांडला आहे. त्यामध्ये थरार, नाटय़, कौटुंबिक ताणेबाणे, कु रघोडी असे सारे काही अगदी ठासून भरले आहे. घातपाताच्या इतक्या मोठय़ा घटनेनंतर यंत्रणा पुन्हा मार्गावर आणताना काय कसरत असू शकते त्याचे एक व्यापक चित्रण मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतून अमेरिकी राजकारण, एफबीआय किंवा सीआयएने केलेला कटकारस्थानाचा तपास असे चित्रण अनेकदा असते. काही अपवाद सोडल्यास तांत्रिक करामती आणि साचा ठरलेला असतो. ‘डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर’मध्येदेखील अशा अनेक घटना आहेत, पण हे कथानक साच्यात अडकत नाही हे त्याचे वैशिष्टय़. येथे सगळा भर हा अराजकीय राष्ट्राध्यक्ष असलेला टॉम क्रिकमन एक माणूस म्हणून हे सर्व कसे हाताळतो त्यावर अधिक आहे. त्यामुळे टिपिकल पद्धतीच्या शह काटशहाला फारसा वाव राहत नाही. टॉमच्या अराजकीय भूमिकेमुळे तो अनेकदा चांगलाच लोकप्रिय ठरतो, पण त्याचबरोबर त्याच्यावरील संकटेदेखील वाढतात. ही संकटे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरची असतात तेव्हा त्याचा आणखीनच कस लागतो.

आदर्श कार्यपद्धतीचे आकर्षण जरी सर्वाना असले तरी त्याच वेळी प्रत्यक्षात तिचा वापर प्रभावी होईलच याची खात्री नसते. तसेच येथेदेखील होते. टॉमची आदर्श कार्यपद्धतीमुळे कधीकधी खूपच कल्पनाविलास वाटतो, पण कथानकाच्या मांडणीमुळे त्याकडे डोळेझाक करायला हरकत नाही. ही मांडणी खूपच प्रवाही असल्यामुळे त्यातील खटकणाऱ्या बाबी दूरच राहतात.

पहिल्या भागापासूनच थेट पकड घेतल्यानंतर सुरुवातीचा बराचसा काळ बॉम्बस्फोटाचे धागेदोरे शोधण्यातच अधिक जातो. त्याला समांतरपणे राजकारण आणि इतर बाबी सुरू असतात, पण तपासाचा भाग बऱ्याच ठिकाणी राष्ट्राध्यक्षापासून दूर जाणारा आहे. एफबीआय तपास अधिकारी हॅना वेल्स हिचीची मालिका आहे असे वाटण्याइतपत त्या टप्प्यातील कथानक विस्ताराने मांडले आहे, ही त्रुटी नमूद करावी लागेल. तुलनेने नंतरच्या टप्प्यात इतर बाबींनी हा पट व्यापला आहे.

सर्वाधिक अधोरेखित करणारी बाब म्हणजे मालिकेच्या विविध टप्प्यांमध्ये महत्त्वाच्या पात्रांच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीवरील घटनांना चांगलाच वाव दिला आहे. बहुतांश वेळा अशा मालिकांमध्ये हा वाव अजिबातच नसतो. तो येथे प्रभावीपणे दिसून येतो. तर दुसरीकडे अमेरिकन नागरिकांच्या वास्तवालादेखील मालिकेत अनेक ठिकाणी चांगलीच जागा मिळाली आहे.

काल्पनिक कथानक मांडताना अनेकदा विपर्यास होण्याचा संभव असतो. तो टाळून एक चांगली कलाकृती सादर करणे हे कौशल्य असते. ‘डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर’मध्ये ते अगदी चपखलपणे आले आहे. ही महान कलाकृती नसली तरी एक उत्तम प्रभावी मालिका नक्कीच आहे.

डेसिग्नेटेड सव्‍‌र्हायवर

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स

सीझन – एक, दोन आणि तीन