बॉलिवूडमधील प्रतिष्ठीत कुटुंबांमध्ये आघाडीवर असलेल्या बच्चन कुटुंबाच्या मुंबईत काही महागड्या प्रॉपर्टी आहेत. आम्ही बोलतोय त्यांच्या प्रतिक्षा आणि जलसा या जुहू येथील बंगल्यांबद्दल. पण, याव्यतिरीक्तही अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुंबईत एक महागडे अपार्टमेण्ट घेतले असून, त्यात तब्बल २१ कोटींचे इंटेरिअर करण्यात येणार असल्याचे कळते.

वाचा : कल्याणचा नचिकेत लेले ठरला ‘सारेगमप -घे पंगा कर दंगा’चा महाविजेता

वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथे असलेलं हे ‘लॅव्हिश अपार्टमेण्ट’ तब्बल साडे पाच हजार चौरस फूटांचे आहे. ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’ वेबसाइटने ही माहिती दिली आहे. पण या अपार्टमेण्टमध्ये ऐश्वर्या – अभिषेकची शेजारी कोण असणार आहे, ते तुम्हाला माहितीये का? तर वेबसाइटच्या माहितीनुसार, बॉलिवूडची ‘स्टाइल दीवा’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूर त्यांची शेजारीण असेल. ऐश्वर्या – अभिषेकने २०१५ मध्ये हे अपार्टमेण्ट विकत घेतले होते. या तीन प्रॉपर्टींव्यतिरीक्त बच्चन कुटुंबाने वरळीत (या इमारतीत विराट आणि अनुष्कानेही घर घेतले आहे ) आणि दुबईतही घर घेतले आहे.

वाचा : लग्न न करताच बाबा हो, राणी मुखर्जीचा सलमानला सल्ला

‘रात और दिन’ चित्रपटाच्या रिमेकसाठी ऐश्वर्याने तब्बल दहा कोटी रुपये मानधन घेतल्याने ती काही दिवसांपासून चर्चेत आहे. मूळ चित्रपटात दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांनी भूमिका साकारली होती. आता ऐश्वर्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसणार आहे. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिका साकारत असल्यामुळे तिला अधिक तयारी करण्याची गरज आहे. या चित्रपटासाठी बराच वेळ लागणार आहे. यासाठी तिला इतर चित्रपटांच्या कामाकडे काही काळाकरिता पाठ फिरवावी लागेल. त्यामुळे निर्मात्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता तिने मागितलेल्या मानधनासाठी होकार दिला आहे.