मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहे. नवीन विषय आणि चांगल्या मांडणीमुळे आज मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळेच सधन निर्माते आणि प्रायोजकांचा मराठीतला वावर वाढताना दिसून येत आहे. येत्या २ जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘बहन होगी तेरी’ आणि ‘डाव’ या मराठी-हिंदी द्विभाषिक चित्रपटांचे प्रायोजक ‘ऑडबॉल मोशन पिक्चर’ हे त्यातलेच एक उदाहरण. ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या आगामी मराठी सिनेमाचे देखील ते प्रायोजक असून, या चित्रपटाद्वारे ते प्रथमच एक नवीन विषय घेऊन मराठीत येत आहे.

‘देव देव्हाऱ्यात नाही’ या सिनेमाचे आणखीन एक वैशिट्य म्हणजे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज व्यक्तिमत्व असणारे विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये हे प्रसिद्ध कलाकार यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोघांनी हिंदी तसेच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. प्रवीण बिर्जे दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्यघटनेवर प्रेरित असून, याची कथा, पटकथा तसेच संवाद आशिष देव यांनी लिहिली आहे. नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये या दिग्गज जोडीबरोबरच यात अभिनेत्री रीना अगरवालदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अस्सल कौटुंबिक मेलोड्रामा असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या मे महिन्यापासून सुरुवात होत आहे. ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा नेमका कोणत्या सत्यघटनेवर प्रेरित आहे, याचे कुतूहल प्रेक्षकांना नक्कीच असेल!