19 October 2018

News Flash

कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते- तेजस्विनी पंडित

२०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे.

तेजस्विनी पंडित

‘मी सिंधू ताई सपकाळ’, ‘तू ही रे’ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला २०१८ चे उत्तरार्ध वर्ष खूप अनुकूल ठरले आहे. २०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे. त्याचं कारण म्हणजे तेजस्विनीचे नुकतेच प्रदर्शित झालेले दोन चित्रपट. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनीचा ‘देवा’ तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे या दोन्ही चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल्ल केलं. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना छान प्रतिसाद दिला.

वाचा : ..म्हणून घटस्फोटावर बॉलिवूडमध्ये फार चित्रपट येत नाहीत

‘देवा’मध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेतून दिसली. या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरीसोबत काम केलं. चित्रपटात तिने केलेल्या अनोख्या फॅशनबद्दल देखील प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली तर ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली. सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामतसोबत तेजस्विनीदेखील भाव खाऊन गेली. दिग्दर्शक संजय जाधवसोबत तिचा हा दुसरा सुपरहिट चित्रपट. ‘देवा’ आणि ‘ये रे ये रे पैसा’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्याने तेजस्विनी भलतीच खूश झाली आहे.

वाचा : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..

दोन सुपरहिट चित्रपटांचा तू भाग झालीस, त्याचा अनुभव कसा होता? असा सवाल तेजस्विनीला केला असता ती म्हणाली की, ‘दोन्ही चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्डाच्या नियमांमुळे ‘देवा’ २२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आणि ‘ये रे ये रे पैसा’ ५ जानेवारीला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखांमध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती. पण दोन्ही चित्रपटांच्या टीम सांभाळून घेणाऱ्या होत्या त्यामुळे मला दोन्हीकडे लक्ष देता आलं. तसंच ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपत चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो! पण निश्चितपणे अपेक्षा असतात. हा चित्रपट कमी धंदा करेल म्हणून मी माझं काम १०० टक्के देणार नाही असं गृहीत न धरता कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मी त्या चित्रपटाचा १०० टक्के भाग होण्याचा प्रयत्न करत असते कारण कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते.’

First Published on January 13, 2018 2:42 pm

Web Title: deva and ye re ye re paisa tejaswini pandit given two hit movies in a row