News Flash

भक्तीयुक्त मनोरंजन

देवभक्तीपर, चमत्कारांनी भरलेले संतपट अशी दीर्घ परंपरा मराठी चित्रपटांना आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ‘जय संतोषी माँ’ तसेच मराठी व हिंदीमध्ये साईबाबा यांच्यावरील चित्रपटांचीही विशिष्ट परंपरा आहे.

| August 2, 2015 03:41 am

देवभक्तीपर, चमत्कारांनी भरलेले संतपट अशी दीर्घ परंपरा मराठी चित्रपटांना आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ‘जय संतोषी माँ’ तसेच मराठी व हिंदीमध्ये साईबाबा यांच्यावरील चित्रपटांचीही विशिष्ट परंपरा आहे. सिनेमावाल्यांची ‘कमर्शियल देशभक्ती’ दाखविणारेही असंख्य चित्रपट आहेत. याच परंपरेतील आजचे कथानक गुंफून चांगल्या प्रकारे भक्तीयुक्त मनोरंजन देण्याचा प्रयत्न ‘देऊळबंद’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा लढा, त्यात सुष्ट प्रवृत्तीचा विजय या फॉम्र्युल्याप्रमाणेच या चित्रपटात नास्तिक विरुद्ध आस्तिक असा संघर्ष दाखविण्याचा चांगला प्रयत्न चित्रपटकर्त्यांनी केला आहे. श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा, विज्ञान विरुद्ध अध्यात्म यांसारख्या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. मात्र चित्रपटाचा मध्यांतरापर्यंतचा भाग प्रचंड संकलित करण्याचे राहून गेल्याचे जाणवते. मध्यंतरानंतर चित्रपट खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो.
कोणताही भक्त संप्रदाय आणि त्या भक्त संप्रदायाचे अंतिम गुरू यांची महत्ता सिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टी दाखविण्यासाठी संबंधित संप्रदायाच्या गुरूंची पोथी, सत्य-काल्पनिक घटना यांचा आधार चित्रपट करताना घेतला जातो. ‘देऊळबंद’ चित्रपटात मात्र स्वामी समर्थ संप्रदायाच्या कोणत्याही पोथ्या-प्रवचनांचा आधार घेतलेला नाही ही या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल.
राघव शास्त्री हा मूळ भारतीय वंशाचा असला तरी अमेरिकन नागरिक आहे. तो कामानिमित्त भारतभेटीवर येतो. प्रोजेक्टचे काम पूर्ण करून अमेरिकेत परत जाण्यासाठी तो आपली पत्नी आणि मुलीसमवेत भारतात येतो. पक्का नास्तिक आणि फक्त स्वत:ची बुद्धिमत्ता, कर्तृत्व यावर कमालीचा दांडगा विश्वास राघव शास्त्रीला आहे. तो ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. त्याच संदर्भात तो भारतातील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांना भेटून प्रकल्प हाती घेतो आणि काही चाचण्या घेतो. त्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञ अपयशी ठरतात. आता फक्त आपण एकटेच प्रकल्पाचे काम पूर्ण करणार असे राघव शास्त्री छातीठोकपणे सांगतो. राघव शास्त्री हा नासाशी संबंधित शास्त्रज्ञ असल्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याकडून त्याच्या सुरक्षेसाठी त्याला व त्याच्या कुटुंबाला पंचतारांकित हॉटेलऐवजी एका रहिवासी सोसायटीतील सदनिकेत राहावे लागते. त्या सोसायटीत स्वामी समर्थाचे देऊळ आहे आणि असंख्य भक्त तिथे येऊन सदान्कदा भजन-कीर्तनादी कार्यक्रम करीत असतात. ते राघव शास्त्रीला नको असते. म्हणून तो सुरुवातीला सोसायटीतील समस्त भक्तांना टाळतो. नंतर त्यांच्यावर चिडतो आणि एक दिवस आपली ताकद वापरून देऊळ बंद करायला लावतो. राघव शास्त्री आता अमेरिकेचा नागरिक असला तरी भारतात तो राहात असतानाच्या त्याच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी, त्याचा नास्तिकपणा, त्याचा विज्ञानावरचा ठाम विश्वास आणि नंतर अर्थातच त्याचे मन परिवर्तन असा सरळ आलेख ‘देऊळबंद’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
स्वामी समर्थ संप्रदायाची कोणतीही पोथी, प्रवचने यावर आधारित कथानक न मांडता दिग्दर्शकद्वयीने थेट स्वामी समर्थ या चित्रपटात दाखविले आहेत. राघव शास्त्रीच्या भूमिकेतील गश्मीर महाजनी आणि स्वामी समर्थ यांच्या भूमिकेतील मोहन जोशी यांची जुगलबंदी, यांच्यातील वाद असा थेट संघर्ष दाखविण्याची कल्पकता लेखक-दिग्दर्शकांनी दाखविली असून तोच या चित्रपटाचा सगळ्यात सामथ्र्यबिंदू ठरला आहे.
आजच्या काळातील कथानक मांडताना राघव शास्त्रीचा प्रकल्प पूर्ण होता होता एका चुकीमुळे अडकतो. हा प्रकल्प ज्या संगणकावर तयार केला आहे तो पूर्ण करताना द्यावा लागणारा पासवर्ड ‘लॉक’ होतो. हा पासवर्ड नेमका शोधून काढून आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी राघव शास्त्री जंग जंग पछाडतो. त्यासाठी तज्ज्ञाला भेटण्याची आवश्यकता निर्माण होते व त्यासाठी त्याला पुणे ते श्रीहरीकोटा व नंतर अन्य तीर्थस्थानी प्रवास करावा लागतो. राघव शास्त्रीच्या भूतकाळातील गोष्टी आणि पासवर्ड कोड मिळविण्यासाठी सांप्रत काळातील त्याची गोष्ट यांची गुंफण करून भक्तीयुक्त मनोरंजन चित्रपटकर्त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले आहे.
मध्यंतरापूर्वीचा अर्धा चित्रपट मात्र कंटाळा आणणारा झाला आहे. प्रकल्प हाती घेतल्यापासून ते सोसायटीत राहायला आल्यानंतर स्वामी समर्थ संप्रदायाचे भक्तांचे सतत भजन-कीर्तन करणे, भजनासाठी राघव शास्त्रीला दररोज पाचारण करणे, दररोज राघव शास्त्रीने ठाम नकार देणे, या आणि अशाच प्रसंगांचा कंटाळवाणा भडिमार दाखविताना चित्रपट कंटाळा आणतो. परंतु, मध्यंतरानंतर कथानक चांगलेच वेग घेते आणि उत्तम करमणूकही चित्रपट करतो. गश्मीर महाजनीने नास्तिक असलेली राघव शास्त्री ही भूमिका चांगली साकारली आहे. मोहन जोशी यांनी स्वामी समर्थ या भूमिकेत मिस्कीलपणा दाखवून धमाल केली आहे. अन्य सर्वच कलावंतांनी दिग्दर्शकबरहुकूम अभिनय केला आहे.
वटवृक्ष एण्टरटेन्मेंट प्रस्तुत
देऊळबंद
निर्मात्या – जयश्री वाणी, जुईली वाणी
पटकथा-दिग्दर्शन – प्रवीण तरडे, प्रणीत कुलकर्णी
कथा-संवाद – प्रवीण विठ्ठल तरडे
संगीत – नरेंद्र भिडे
छायालेखक – प्रशांत मिसळे
संकलक – मयूर हरदास
कलावंत – गश्मीर महाजनी, गिरिजा जोशी, मोहन आगाशे, निवेदिता सराफ, सतीश आळेकर, किरण यज्ञोपवित, श्वेता शिंदे, शर्वरी जमेनीस, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, दीपक करंजीकर, मोहन जोशी, आर्य घारे, रवींद्र महाजनी, सुनील बर्वे, सुशांत शेलार, विभावरी देशपांडे, संदीप पाठक, प्रसाद ओक, देवेंद्र गायकवाड, हृषीकेश देशपांडे, रमेश परदेशी, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर, प्रमोद पवार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:41 am

Web Title: devotional entertainment
Next Stories
1 ‘गुण्यागोविंदाने’
2 ‘बिग बी’कडून सुलोचनादीदींचे अभीष्टचिंतन
3 उमेश शुक्लांची
Just Now!
X