चित्र रंजन : रेश्मा राईकवार

दबंग ३ :- चुलबुल पांडेंच्या चमत्कारिक कारनाम्यांचा तिसरा भाग म्हणून धडाक्यात दाखल झालेल्या ‘दबंग ३’मध्ये सलमान खानचीच दबंगगिरी दिसते, अर्थात तीच पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येतो हे खरे आहे. पण, आधी प्रदर्शित झालेल्या दोन ‘दबंग’पटांचा एकत्रित विचार केला तर त्यातील मनोरंजनाचा लसाविही या तिसऱ्या पूर्व कथानकाच्या भागात पहायला मिळत नाही. लांबलचक ताणलेली कथा, जगात काहीही झाले तरी पांडेजीच हिरो असणार हे माहिती असताना उगाच प्रभुदेवा स्टाईल हाणामारी आणि सहा गाण्यांचे डबे जोडलेली पांडेजींच्या कारनाम्यांची मालगाडी पाहायला मिळते.

चित्रपटाचा पुढचा भाग म्हणून प्रदर्शित झालेल्या ‘दबंग ३’मध्ये चुलबुल पांडेची पूर्वकथा दाखवण्यात आली आहे. स्वत:ला गुंडे पोलीस म्हणवणारा चुलबुल असा का घडला? किंबहुना तो पोलीस अधिकारी का झाला? (म्हणजे तुम्ही मनातल्या मनात या प्रश्नाचे वेगळे अर्थ काढू नका उगाच..) पण आधीच्या दोन भागांमध्ये प्रचंड हुशार दिसलेले पांडेजी मुळात काहीच करत नव्हते, असे चित्रपटाची कथा सांगते. आणि चुलबुलचे मूळ नावही वेगळे आहे, तर तो मुळातच चुळबुळ्या स्वभावाचा असल्याने त्याचे हे नाव त्याच्या ‘पर्सनॅलिटी’ला सूट होत असले तरी हे त्याचे खरे नाव नाही. तर त्याला त्याच्या पूर्वप्रेयसीने दिलेले हे नाव आहे. आता या पूर्वप्रेयसीचे आणि आत्ताच्या पत्नीचे आणि मुळातच चुलबुलचा ‘पांडेजी’ कसा झाला हे सांगणाऱ्या कथानकाचे सूत ज्या पद्धतीने लेखक म्हणून सलमान खानने (श्रेयनामावलीतील उल्लेखाप्रमाणे) आणि दिग्दर्शक म्हणून प्रभुदेवा यांनी जुळवून आणले आहे की काय वर्णावे.. तर आपले पूर्वाश्रमीचे पांडेजी काहीच करत नव्हते मात्र त्यांचा जीव जिच्यावर जडला होता ती खुशी (सई मांजरेकर) डॉक्टर बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होती. अर्थात, ही गोष्ट खुशीच्या तोंडून कधीच बाहेर पडत नाही, ते फक्त पांडेजीच सांगत राहतात. एका वळणावर ही गोडगुलाबी प्रेमकथा अर्धवट राहते. आणि ज्याच्यामुळे अर्धवट राहते तो बाला सिंग (सुदीप) हा या पांडेकथानकातला खलनायक ठरतो. खलनायक अधिक ‘खल’ वाटावा, त्याहीपेक्षा पांडेजींना प्रभुदेवा शैलीतील हाणामारी अधिक दाखवता यावी यासाठी बाला सिंगच्या व्यक्तिमत्त्वाशी बलात्कार, मानवी तस्करी असे गैरधंदेही जोडलेले आहेत. पण अर्थात खलनायकाच्या तोंडी असा संवादही आहे की, विजय फक्त वाईटाचाच होतो. कारण चांगली माणसे वाईट कृत्य करण्याइतकी दुष्ट नसतातच. मात्र पांडेंजींच्या चांगुलपणावर असलेला बालाचा हा अतिविश्वासच त्याला घातक ठरतो.

या संपूर्ण ‘दबंग’पटात सलमानच सलमान भरून राहिला आहे, त्यातल्या त्यात सोनाक्षी सिन्हाची ‘रज्जो’ दोन-तीन गाणी आणि प्रसंग स्वत:साठी टिक वून ठेवून असली तरी यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा सलमान नावाच्या एकाच कण्यावर उभ्या आहेत. तो नसेल तर या व्यक्तिमत्त्वांना स्वत:चे असे काहीच अस्तित्व नाही. चुलबुल हा सगळ्यांचा तारणहार आहे, त्यामुळे व्यक्तिरेखा कोणतीही असू दे तुम्हाला सलमान एके सलमानच दिसणार. बाकी दोन्ही चित्रपटांतील यथेच्छ लोकप्रिय संवादांचीही जन्मकथा या चित्रपटात पाहायला मिळते. प्रभुदेवाचे दिग्दर्शन असल्याने त्याच्या चित्रपटात अ‍ॅक्शन आणि संवाद उत्तम म्हणजे मनोरंजक असलेच पाहिजेत ते इथे पुरेपूर पाहायला मिळतात. गाणी सगळीच फसलेली आहेत त्यामुळे गाण्यांमधला नृत्याचा प्रभुदेवाई करिश्माही कामाचा नाही. उलट सारखी सारखी येणारी गाणी कथेतला उरलासुरला रसही घालवून टाकतात. म्हणायला चित्रपटात खूप सारे कलाकार आहेत. त्यातल्या त्यात डिम्पल कपाडियांचा वावर सुखावून जातो. बाकी सगळे मधून मधून चमकून जातात. त्यामुळे इथे अभिनयाबद्दल बोलण्यासारखे काही नाही. सलमानने नेहमीच्या जोशात पांडे साकारला आहे, पण आता त्यात काही नावीन्य उरलेले नाही. अर्थात, दबंगगिरी पुढे सुरू ठेवायचा विचार चित्रपट संपता संपता पांडेजींनी बोलून दाखवला आहे, पण तेव्हा ते खातेबदलाच्याही तयारीत असल्याचे कळते. थोडक्यात ओढूनताणून केलेल्या तिसऱ्या दबंगगिरीला आधीच्या किंवा पहिल्या ‘दबंग’ची सर अजिबात नाही.

दिग्दर्शक – प्रभुदेवा 

 कलाकार – सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, राजेश शर्मा, सुदीप, डिम्पल कपाडिया.