नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेल्या या बहुचर्चित चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवोदित कलाकारांची मुख्य भूमिका असलेला क्वचित एखादा चित्रपट इतकी चांगली सुरुवात करतो, असं तरणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे करण जोहरच्या ‘स्टुंडट ऑफ द इयर’ या चित्रपटापेक्षा जास्त ‘धडक’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर कमावले आहे, असंही त्याने सांगितलं आहे. ‘स्टुंडट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने आठ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे जान्हवीच्या ‘धडक’ने आलियाच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ला मागे टाकलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता होती. याचं पहिलं कारण म्हणजे हा ‘सैराट’चा रिमेक आहे आणि दुसरं म्हणजे श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीच्या पदार्पणाचा चित्रपट आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या घोषणेपासूनच बरीच चर्चा होती. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhadak box office collection day 1 janhvi kapoor and ishaan khatter film earns rs 8 71 crore
First published on: 21-07-2018 at 20:36 IST