‘सैराट’ या मराठीतील सर्वात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट जगभरातील विविध देशांमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे तिथेही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे.

धडक अमेरिका, सौदी, युके येथील चित्रपटगृहातही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याचदिवशी आंतरराष्ट्रीय पातळीवर ३ कोटी ३४ लाखांहून अधिक कमावले असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. ही प्राथमिक आकडेवारी आहे अजून काही देशांतील आकडेवारी यायची आहे त्यामुळे नक्कीच ही आकडेवारी मोठी असेल असंही ते म्हणाले.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं भारतात पहिल्या दिवशी ८.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. नवोदित कलाकारांच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद कमालीचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या हिंदी ‘सैराट’ला किती प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखं ठरेल.