अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ हा चित्रपट येत्या २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली असून नवोदित कलाकार इशान आणि जान्हवी यांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही जोडी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून या चित्रपटाविषयी अनेक नवनवीन खुलासे होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. जान्हवीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची श्रीदेवी यांची फार इच्छा होती. मात्र चित्रपट प्रदर्शनापूर्वीच श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. परंतु अनेक वेळा बॉलिवूडमध्ये कसे वावरावे किंवा कोणत्या चित्रपटांची निवड करावी याविषयी श्रीदेवी यांनी जान्हवीला मार्गदर्शन केले होते.

श्रीदेवी यांच्या निधनापूर्वी त्यांनी ‘धडक’ चित्रपटाची २५ मिनीटांची एक क्लिप पाहिली होती आणि ही क्लिप पाहिल्यानंतर त्यांनी जान्हवीला एक मोलाचा सल्ला दिला होतो. श्रीदेवी यांचा हा सल्ला नुकताच जान्हवीने साऱ्यांसमोर जाहीर केला आहे.

या क्लिपमध्ये जान्हवीच्या डोळ्यावरील मस्करा पसरला होता. हा पसरलेला मस्करा पाहून श्रीदेवी यांनी जान्हवीला ‘कलाकाराला अभिनयाबरोबरच व्यक्तीमत्व आणि चेहऱ्याची ठेवन जपावी लागते. आपण प्रेक्षकांपुढे एक आरसा म्हणून सादर होत असतो. त्यामुळे आपण टापटीप आणि नेटनेटके दिसणं तेवढंच महत्वाचं आहे’, असा सल्ला दिला होता. तसेच ‘चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये कमी मेकअप कर त्यामुळे तुझं सौदर्य खुलण्याबरोबरच चित्रपटातील नायिकेला तू न्याय देऊ शकशील’, असे दोन सल्ले श्रीदेवी यांनी दिले होते.

दरम्यान, जान्हवीने आईचा हा सल्ला लक्षात ठेवत चित्रपटाचे पुढील चित्रीकरण केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ‘धडक’ची टीम प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असून नुकतीच ही टीम महाराष्ट्रातील पुण्यात पोहोचली होती.