News Flash

दिल्लीतील शीखविरोधी दंगलीतील होरपळीवर चित्रपट

‘धग’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे काम सुरू केले आहे.

| February 14, 2014 06:44 am

‘धग’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे काम सुरू केले आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर अर्थात ३१ ऑक्टोबर १९८४ नंतरचे ३-४ दिवस दिल्लीत जे मृत्यूचे तांडव सुरू होते त्यात अनेक कुटुंबे विनाकारण होरपळली. त्या दिवसांत जो थरार घडला तो प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या कुटुंबाभोवती नव्या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. सोहा अली खान हिची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
३१ ऑक्टोबर १९८४ हा दिवस आणि त्यानंतरच तीन दिवस हा आपल्या देशाचा रक्तरंजित इतिहास आहे. इंदिराजींच्या हत्येनंतर शीखांच्या विरोधात जी दंगल उसळली त्यात दिल्ली आणि आजूबाजूच्या शीखबहुल परिसरातील अनेक कुटुंबांची वाताहत झाली. माझ्या चित्रपटात त्यांच्या हत्येनंतर घडलेल्या गोष्टींचे संदर्भ आहेत. यात कुठलीही राजकीय टीकाटिप्पणी नाही, असे पाटील यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.  या दंगलीतली दहशत आपल्या कुटुंबियांसमवेत अनुभवणारा एक निर्माता माझा शोध घेत आला. त्याला आपला हा अनुभव चित्रपटातून मांडायचा होता. त्याने माझा चित्रपट पाहिला. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे हे कळल्यावर त्याने माझी भेट घेऊन कथा ऐकवली. एक दिग्दर्शक म्हणून अशी कथा चित्रपटातून मांडणे हे मला आव्हानात्मक वाटले आणि हा चित्रपट आपण करायचाच, असे ठरवल्याचे पाटील यांनी सांगितले.
या चित्रपटासाठी संशोधन फार महत्त्वाचे होते. गेले आठ-एक महिने या चित्रपटाच्या पटकथेसाठी अभ्यास सुरू होता, असे पाटील म्हणाले. ही कथा लिहित असतानाच जेव्हा कलाकारांची निवड करण्याबाबत विचार सुरू झाला तेव्हा सोहासारखी गुणी अभिनेत्री या कथेला न्याय देऊ शकेल, असे वाटले. तिनेही कथा ऐकली आणि मला संपूर्ण तयार पटकथा द्या. हा चित्रपट मीच करणार, असे ठामपणे सांगितले. सगळ्या गोष्टी मनासारख्या जुळून आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सोहाबरोबर ‘देल्लीबेली’ फेम विनोदी अभिनेता वीर दासही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील कलाकारांची निवड पूर्ण झाली असून येत्या मार्च-एप्रिलमध्ये फिल्मसिटीत सेट उभारून चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या शीर्षकाबरोबरच अन्य अनेक गोष्टींची जुळवाजुळव अद्याप सुरू झालेली नाही, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 6:44 am

Web Title: dhag director shivaji lotan patil entry in bollywood
Next Stories
1 व्हेंलेटाइन डे
2 गोविंदाच्या ‘ना हिरे नु सता’ या म्युझिक अल्बमचे लाँचिंग
3 सलमाची ‘जय हो’ सहकलाकार डेझी शहावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा?
Just Now!
X