प्रसिद्धीमाध्यमांपासून आणि बॉलीवूडच्या तथाकथित ग्लॅमरपासून स्वत:ला थोडं दूर ठेवणारी काजोल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा ‘व्हीआयपी २’ हा अभिनेता धनुषबरोबरचा दाक्षिणात्य चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला तिने दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं होतं. १९९७ साली राजीव मेनन दिग्दर्शित ‘मिनसारा कनावू’ या चित्रपटात तिने प्रभुदेवा आणि अरविंद स्वामीबरोबर काम केलं होतं. जो हिंदीत ‘सपने’ नावाने प्रदर्शित झाला होता. त्यानंतर वीस वर्षांनी तिने हा दाक्षिणात्य चित्रपट स्वीकारला आहे. यानिमित्ताने बोलताना तिने पुन्हा एकदा आपल्याला सदासर्वदा चेहऱ्याला रंगरंगोटी करून नीटनेटकं राहायला जमत नाही. तो मूर्खपणा वाटतो, असं सांगत बहार उडवून दिली आहे. आपल्या याच मनमोकळं बोलण्याचा फटका आपल्या नवऱ्याला अजय देवगणला जास्त बसतो, असं तिने गमतीत सांगितलं.

काजोल बॉलीवूडमध्ये नेहमीच फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपण आतून जसे आहोत तसंच बाहेरही व्यक्त होतो. मनात एक आणि वागण्यात दुसरं अशा पद्धतीने आपल्याला वागताच येत नाही, असं ती म्हणते. तिच्या या प्रामाणिकपणाचं, मोकळंढाक ळं वागण्याचं तिच्या चाहत्यांना नेहमीच कौतुक वाटत आलंय. पण तेवढी एकच गोष्ट अजय देवगणच्या पथ्यावर पडत नाही असं ती सांगते. अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा पाटर्य़ामध्ये आपल्या या प्रामाणिक बोलण्यामुळे अजयवर संकटांची मालिका सुरू होते, असा अनुभव तिने सांगितला. या प्रामाणिकपणाची मोठी किंमत मला घरी अजयकडे चुकती करावी लागते, असंही ती म्हणते. मला उगाचच गोड गोड बोलताच येत नाही. मी जे खरं आहे ते जसंच्या तसं बोलून टाकते. मग ती इंडस्ट्रीतली व्यक्ती असली तरी मी त्याचा विचार करत नाही. अजयने कित्येकदा इंडस्ट्रीतील लोकांसमोर असं फटक न् बोलून जाऊ नकोस, असं सांगून पाहिलं आहे. पण त्याला त्याचा कितीही त्रास झाला तरी माझ्याकडून माझा स्वभाव सुटत नाही आणि मग त्याचं रूपांतर अजयच्या चिडण्यात होतं, असं सांगणारी काजोल आपल्याला आहे तसं सहन करणाऱ्या आपल्या बॉलीवूडमधील सहकाऱ्यांचंही कौतुक करते.

अजयसाठी म्हणून नव्हे पण माझ्या मनात जे आहे ते अगदी चांगल्या-चांगल्या शब्दांत, दुसऱ्याला कमीत कमी त्रास होईल अशा शब्दांत मांडण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मी खूप नशीबवान आहे की लोकांच्या तोंडावर सत्य सांगूनही ते मला माफ करतात. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे तो.. असं ती म्हणते. फिल्मी कुटुंबातच लहानाची मोठी झालेली काजोल बॉलीवूडच्या ग्लॅमरस, फिल्मी गोष्टींमध्ये मात्र रमत नाही. हा विरोधाभास आहे पण तिला त्यापासून दूरच राहायला आवडतं. किंबहुना, बॉलीवूडची कुठली गोष्ट तुला आवडत नाही?, या प्रश्नावर सध्या जे काही एअरपोर्ट लुक वगैरे गोष्टींच्या नावाखाली कलाकारांचा प्रत्येक वेळी नीटनेटकं राहण्याचा जो आटापिटा सुरू असतो तो आपल्याला अजिबात आवडत नाही, असं तिने स्पष्ट केलं. विमानाने इतक्या लांबचा प्रवास करून आल्यानंतर लांबलचक हिल्स आणि ओठांवर अगदी परफेक्ट असलेला लिपस्टिकचा रंग सांभाळत मी विमानतळावरून बाहेर पडू शकत नाही. विमानातून प्रवास करून आलेला माणूस हा कुठल्या तरी संकटाशी सामना क रून बाहेर पडल्यासारखाच दिसतो आणि त्यात काही वावगं नाही, असंही ती ठामपणे सांगते.

मी सर्वसाधारण कपडे घालते, अन्य लोक ज्या गोष्टी वापरतात त्याच मी वापरते. एअरपोर्ट लुक वगैरे गोष्टी मला पटत नाही. मुळात प्रवासासाठी सपाट चपला तयार केल्या गेल्यात. मग त्या सोडून उगाचच हाय हिल्स घालून वावरण्याचं कारणच काय?, साइझ झीरो हा काय प्रकार आहे मला या संकल्पनाच समजत नाहीत आणि याबाबतीत कोणी माझ्यावर टीका केली तर मी त्यांना मनावरही घेत नाही. टीकाकारांचा नसता दबाव घेण्यात काहीच अर्थ नाही, असं तिने सांगितलं.

मुळात, मी जशी आहे तसं लोकांनी मला स्वीकारलं आहे. पडद्यावर काहीएक भूमिका करताना त्यानुसार काही गोष्टी पाळाव्या लागतात, कराव्या लागतात हे मला समजतं. पण रुपेरी पडद्यापलीकडे वास्तव जीवनात मात्र आपण कसं वागलं पाहिजे याचा विचार करताना तुम्ही काही एक भान ठेवायला हवं. ते गरजेचं आहे असं सांगणारी काजोल सध्या तरी ‘व्हीआयपी २’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. धनुषबरोबरच्या या चित्रपटात एका सुंदर, महत्त्वाकांक्षी उद्योजिकेची भूमिका ती करते आहे. याशिवाय, आनंद गांधी दिग्दर्शित चित्रपटातही ती काम करत असून त्याची निर्मिती अजय देवगण करणार आहे.

फॅशनच्या नावाखाली कलाकारांचे जे सव्यापव्यास सुरू असतात ते पाहता आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलो आहोत की काय असं आपल्याला वाटत. कलाकारांनी स्वत:च उत्कृष्ट दर्जाबाबत काहीतरी अशक्य मापदंड निर्माण करून ठेवले आहेत. आणि मग स्वत:ला त्यानुसार ढाळण्यासाठी ठराविक एका पद्धतीनेच वागण्या-बोलण्याच्या सवयीत त्यांनी स्वत:ला अडकवून घेतलं आहे. एखाद्या गोष्टीकडे एकाट दृष्टीने, पद्धतीने पाहण्याची बॉलीवुडची सवय त्यांनाच त्रासदायक ठरतेय. – काजोल