दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि बॉलिवूडच्या ‘रांझणा’ने पालकत्वाचा खटला जिंकला आहे. तमिळनाडूमधील एका जोडप्याने धनुष आमचाच मुलगा आहे, असे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. धनुषने महिना ६५ हजार रुपयांचा भत्ता देण्याची मागणी या दाम्पत्यांनी केली होती. पण न्यायालयाने वृद्ध दाम्पत्यांचा दावा फेटाळत धनुषच्या बाजूने निकाल दिला आहे.

या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी न्यायालयाने धनुषच्या डीएनए टेस्टही करायला सांगितल्या होत्या. मदुराई येथे राहणारे ६० वर्षीय आर कथिरेसन आणि त्यांची ५५ वर्षीय पत्नी के मिनाक्षीने ते धनुषचे जन्मदाते माता पिता असल्याचा दावा केला होता. त्यांनी धनुषचे नाव कलाईसेल्वन ठेवले होते आणि मेलूर येथील एका शाळेत त्याचे नावही नोंदवले होते. कथिरेसन यांनी धनुषचा जन्मदाखला आणि लहानपणीचे फोटो पुरावा म्हणून न्यायालयाकडे सादर केले होते.

दाम्पत्यांच्या मागणीवरुन न्यायालयाने धनुषला त्याच्या शरीरावर असलेल्या जन्मखुणा दाखवण्यास सांगितले होते. त्यानंतर धनुषने शरीरावर असलेल्या खुणांची चाचणीही केली होती. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने आपले नाव धनुष के राजा असे ठेवले. धनुष अभिनेता झाल्यानंतर आम्हाला एकदाही भेटला नाही, असे केथिरेसन यांनी न्यायालयात म्हटले होते. पण आता त्यांचे सर्व दावे खोटे सिद्ध झाले असून, धनुष प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा आणि विजयलक्ष्मी यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले आहे.