मराठी साहित्यात दलित, शोषित आणि वंचितांचं विश्व, त्यांचं जगणं, त्यांची भाषा आणि त्यांचा भवताल सत्तर-ऐंशीच्या दशकांत ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा अकस्मात उसळून आला आणि त्यानं मराठी समाजमानसाला प्रचंड हादरे दिले. मराठी रंगभूमी मात्र या विश्वाशी आणि तिथल्या माणसांशी आपल्याला काही देणंघेणं नाही अशा तऱ्हेनं फटकून राहिली. याचं कारण ती पांढरपेशा ब्राह्मणी मध्यमवर्गाच्या हाती होती. त्यातूनच या रंगभूमीला छेद देण्यासाठी दलित रंगभूमीचा स्वतंत्र प्रवाह निर्माण झाला. परंतु अल्पावधीतच तो क्षीण होत गेला आणि नंतर लुप्तच झाला. मुख्य धारा रंगभूमीची धुरा उच्चवर्णीयांच्याच हाती असल्यानं तिथं या उपेक्षित विश्वाचं दर्शन घडणं शक्यच नव्हतं. चाळसंस्कृतीवरची नाटकं रंगभूमीवर आली असली तरी झोपडवस्तीतील माणसांचं जगणं मात्र तिनं सादर करायचं नाकारलं. दलित-वंचित जगणं स्वत: अनुभवलेल्या प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, संजय पवार आदींची नाटकं मुख्य धारा रंगभूमीवर झाली; परंतु ती अपवाद म्हणूनच. किडय़ा-मुंग्यांचं आयुष्य जगणाऱ्यांचं जग, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांचे भोग व्यावसायिक रंगभूमीवर अभावानंच आले. तशी ‘गोलपीठा’सारखी अपवादस्वरूप नाटकं इथं झाली; पण त्यांना प्रस्थापितांकडून प्रचंड विरोध झाला. या पाश्र्वभूमीवर अलीकडे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन् भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं ही लक्ष्मणरेषा झुगारून ते मुख्य धारेत यशस्वी झालं. समांतर धारेत या विश्वाशी संबंधित नाटकं झाली. पण तीही गिनीचुनीच. त्यामुळे मराठी रंगभूमी म्हटली की मध्यमवर्गीयांच्या जीवनजाणिवा, त्यांचं जगणं, त्यांचं विश्व हेच चित्र डोळ्यांसमोर येतं. याचं कारण- मराठी रंगभूमीचा कणा हाच वर्ग राहिला आहे. (म्हणजे आत्ता-आत्तापर्यंत तरी!) लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक.. सब कुछ मध्यमवर्गीय अन् ब्राह्मणी! तर ते असो.
नुकतंच शाहीर संभाजी भगतलिखित व संतोष वेरुळकर दिग्दर्शित ‘बॉम्बे- १७’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. यापूर्वी ते ‘अडगळ’ नावानं समांतर धारेत सादर झालं होतं. मात्र, ते मुख्य धारा रंगभूमीवर येताना सेन्सॉर बोर्डातल्या स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना त्यातला आशय, त्याची भाषा, त्यातल्या माणसांचं जगणं भलतंच खटकलं आणि त्यांनी संहितेवर कात्री चालविण्यास सांगितले. अन्यथा परवाना नाकारण्याची धमकी दिली. अर्थात याचं कारण- या मंडळींनी हे विश्व कधी पाहिलेलंच नाही. त्यामुळे तिथल्या माणसांचं उघडंवाघडं जगणं त्यांना भोवळ आणणारं ठरलं तर त्यात त्यांची चूक नाही. हे नाटक रंगभूमीवर आलं तर तिचं पावित्र्य नष्ट होईल असं त्यांना वाटतं. या मंडळींना चित्रपटातील उत्तान सेक्स आणि शिसारी आणणारी हिंसा चालते; पण प्रत्यक्ष किडय़ा-मुंग्यांचं आयुष्य जगणाऱ्यांचं विश्व रंगभूमीवर दाखवायला मात्र त्यांचा कडाडून विरोध असतो. या दुटप्पीपणाला काय म्हणावं?
‘चक्र’सारख्या काही चित्रपटांतून या माणसांचं जगणं आलेलं आहे. ‘बॉम्बे- १७’ हा धारावीचा पिन कोड क्रमांक. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ती ओळखली जाते. मुंबई नगरीला लागलेला कलंक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. नरकवत आयुष्य जगणारी तिथली माणसं ही माणसं नाहीत? त्यांनाही आपल्यासारख्याच इच्छा-आकांक्षा, भावभावना, विकार-वासना असतात. त्यांचं दर्शन नाटकातून घडवणं हा गुन्हा आहे? काहींना तसं वाटतं खरं. असो.
हे नाटक म्हणजे झोपडपट्टीतल्या नाथा नावाच्या एका सुशिक्षित बेकाराचं  एका रात्रीतलं प्रदीर्घ असं स्वगत आहे. अस्ताव्यस्त अन् दिशाहीन. बी. ए.ची पदवी मिलवूनही कुठंच नोकरी न लागल्यानं बेकार असलेल्या पंचविशीतल्या नाथाचं हे अरण्यरुदन आहे. घरात त्याच्याव्यतिरिक्त लोकांची धुणीभांडी करणारी आई आणि किरकोळ नोकऱ्या करून घराला हातभार लावणाऱ्या दोन मोठय़ा बहिणी. नाथानं मिळेल ती नोकरी करून घराचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा असं त्यांना वाटतं. पण आपल्या योग्यतेची नोकरी मिळत नसल्यानं नाथा कष्टांची चाकरी करायला राजी नाही. त्याच्या बेकारीमुळे अख्खं घर कावलेलं. उठसूठ सगळे त्याला घालूनपाडून बोलतात. तोही त्राग्यानं त्यांना दुरुत्तरं करतो. परिस्थितीनं सगळ्यांनाच हवालदिल केलंय. नाथा त्याच्या परीनं सतरा ठिकाणी अर्ज, लेखी परीक्षा, इंटरव्ह्य़ू वगैरे देत असतोच. पण नोकरीच लागत नाही, त्याला तो तरी काय करणार?
रात्री नाथाची झोपण्याची व्यवस्था पोटमाळ्यावरील अडगळीत केलीय. तिथं उंदरांचा छळवाद, मच्छरांची भुणभुण, रातकिडय़ांची किरकिर, तशात वरून पत्र्याच्या छतावर एकसुरी कोसळणारा पाऊस.. पत्र्याच्या भिंतीआड शेजारच्या खोलीत तरुण जोडप्याचा कुंचबत चालणारा प्रणय, त्यामुळे नाथाच्या  चाळवलेल्या प्रेमभंगाच्या बेचैन आठवणी अन् उफाळून येणारे वासनांचे कढ, दूर कुठंतरी एकतारीवाल्यांचं रात्रभर चालणारं रडकं आध्यात्मिक भजन, मधेच लाऊडस्पीकरवरील गाण्यांचे येणारे बेसूर सूर.. या कोलाहलात नाथाचं आपल्या आयुष्याबद्दल चाललेलं स्वैर चिंतन : कधीच न संपणारी बेकारी, बापाचं कॅन्सरनं जाणं, त्याच्या जाण्यानं मोडून पडलेलं घर, थोरल्या बहिणीचं दारूडय़ा नवऱ्याला आणि चिल्यापिल्यांना मागे सोडून प्रियकरासोबत पळून जाणं.. पडल्या पडल्या नाथाला आगचं-मागचं काय काय आठवत राहतं. तशात लघुशंका झालेली. पण त्यासाठी माळ्यावरून खाली उतरायची पंचाईत. घरातल्यांची झोपमोड होणार. म्हणजे सकाळ होईतो ती दाबून ठेवणं आलं.
त्याला आठवतं- कॉम्रेड राहुल बनसोडसोबतचा क्रांतीच्या स्वप्नांचा जोश.. घरदार सोडून मानवमुक्तीच्या सशस्त्र लढय़ात उतरण्याचा राहुलनं धरलेला आग्रह आणि आपली कचखाऊ माघार, पुढे राहुलचा नक्षलवादी म्हणून गडचिरोलीत झालेला एन्कौंटर.. असं काहीबाही नाथाला रात्रभर छळत राहतं. झोप आधीच उडालेली. समोर काळाकभिन्न अंधार.. भवितव्याचाही. या अडगळीच्या पोटमाळ्यागत आपलंही झालंय, हे त्याला जाणवतं. अडगळ साफ केल्याशिवाय काहीच सुधारणार नाही, या निष्कर्षांप्रत तो येतो.
..तोवर पहाट झालेली असते.
शाहीर संभाजी भगत यांनी झोपडपट्टीतल्या माणसांचं प्रातिनिधिक जगणं यात झडझडून उभं केलं आहे. ही केवळ नाथाची गोष्ट नाहीए, तर बकाल वस्तीत आयुष्य कंठणाऱ्या आणि स्वप्नांचा चुराडाच ज्यांच्या नशिबी आला आहे अशांचं सम्यक दर्शन या नाटकात घडतं. या वस्तीची भाषा, तिथलं जगणं हे पांढरपेशा प्रेक्षकांना सांस्कृतिक धक्का देणारं, किळसवाणं वाटलं तरी ते करकरीत सत्य आहे; जे आपण आजवर साफ नाकारत आलो आहोत. अजून किती काळ आपण अशी वास्तवाकडे डोळेझाक करणार आहोत? इथली माणसंही हाडामांसाचीच आहेत. आयुष्याकडून त्यांचं फार काही मागणं नाहीए. परंतु त्यांच्या तुटपुंज्या मागण्याही पुऱ्या होत नाहीत. त्यांचा आकांत आणि आक्रोश कुणापर्यंत पोचतच नाही. म्हणून मग उदयाला येतात- माफिया डॉन व नक्षलवादी. समृद्धीचे डिंडिम वाजवणाऱ्या राजकारण्यांना याची खबर असली तरी त्यांच्या लेखी ती असते फक्त व्होट बॅंक! आणि स्वार्थाकरता कधीही पेटवता येणारे भूसुरुंग!
संपूर्ण नाटक दोन-तीन प्रसंग वगळता स्वगतस्वरूपाचं आहे. हा रंगभूमीवरील एक अनोखा प्रयोग ठरावा. दिग्दर्शक संतोष वेरुळकरांनी नाटकातील आशय सर्वागानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात कुठलीच कसूर केलेली नाही. लज्जो आणि नाथा यांच्यातील प्रेमप्रसंगांत मात्र ते किंचित प्रेक्षकानुनयाकडे झुकले आहेत. त्यानं नाटकाच्या अस्सलतेत थोडीशी बाधा येते. प्रदीप मुळ्ये यांनी झोपडवस्तीचं आणि अडगळीच्या माळ्याच्या खोलीचं केलेलं वास्तवदर्शी नेपथ्य त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारं आहे. मराठी रंगभूमीवर असं नेपथ्य आजवर कधीच पाहायला मिळालेलं नाही. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे गडद अंधाराच्या पाश्र्वभूमीवर घडणारे घटना-प्रसंग अधिक गहिरे केले आहेत. पूजा गायकवाड यांनी झोपडपट्टीतील माणसांचे कपडे कसे असतात, हे जाणून त्यानुसार वेशभूषा केली आहे. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषेद्वारे ही माणसं जिवंत केली आहेत. अभिषेक खणकर यांनी झोपडपट्टीतील रात्रीच्या विविध आवाजांचा योजलेला ध्वनिपरिणाम नाटय़ाशय प्रभावी करण्यात मोलाची भूमिका बजावतो.
सुनील तांबट यांनी नाथाची चाललेली घुसमट, कोंडी व कुचंबणा ज्या ताकदीनं आविष्कारित केलीय, त्याला तोड नाही. प्रदीर्घ काळ स्वगत बोलताना दमसासाबरोबरच त्यातल्या भावपरिपोषाशी असलेली तादात्म्यता भंग पावू न देणं, हे येरागबाळ्याचं काम नोहे. जवळजवळ सव्वादोन तास त्यांची एकटय़ाचीच काळ आणि अवकाशाशी, नाटय़ाशयातील भावभावनांशी झटापट सुरू असते. एक क्षण जरी त्यांचं बेअरिंग सुटलं तरी नाटक खोल दरीत कोसळणार, हे निश्चित. नाथाची वैफल्यग्रस्तता, त्याचं अडगळीत पडलेलं आयुष्य, त्याबद्दलचं त्याचं आत्मचिंतन, परिस्थितीनं आणि दैहिकअशी झालेली दुहेरी कुचंबणा, भवतालाशी असलेलं नाथाचं नातं.. असा सगळा पट त्यांनी प्रत्ययकारीतेनं उभा केला आहे. लज्जोच्या भूमिकेतील सोनम पवार आणि आई झालेल्या मनिषा चव्हाण याही लक्षवेधी. अजिंक्य दाते यांनी साकारलेल्या कॉम्रेड राहुलचं तत्त्वज्ञानामृत मात्र म्हणावं तितकं कन्व्हिन्सिंग होत नाही. ते कचकडय़ाचं वाटत राहतं. असं का झालं, याचा लेखक-दिग्दर्शकानं शोध घ्यावा.
मराठी रंगभूमीवर एक अस्पíशत जग साकारण्याचे आव्हान ‘बॉम्बे-१७’ने उत्तमरीत्या पेललं आहे.