चित्रपटसृष्टी एक असं क्षेत्रं आहे, जिथे मनोरंजनासोबत कलाकारांचे असंख्य किस्सेसुद्धा प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात. प्रत्येक कलाकाराच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

हा किस्सा आहे, हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाच्या वेळचा. जितेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्याविषयी आपुलकीची भावना होती. पण, हेमा यांनी मात्र जितेंद्र यांना काहीच प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे शेवटी या दोघांनी हे नातं मैत्रीपुरतंच सिमीत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या दिवसांमध्ये हेमा आणि जितेंद्र एकमेकांचे खूप चांगले मित्र ठरले. जितेंद्र यांची काही गुपितंसुद्धा हेमा यांना ठाऊक होती. पण, धर्मेंद्र यांना मात्र त्यावेळी ही मैत्री अजिबात रुचली नव्हती. पण, नशिबात मात्र काही वेगळंच लिहून ठेवलं होतं.

हेमा, जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय त्यावेळी मद्रासला गेले. जिथे या दोघांचं लग्न होणार होतं. पण, तिथल्या एका वृत्तपत्राला याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं. या एका वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला होता. धर्मेंद्रसाठी तर हे सर्व अनपेक्षित होतं. ही बातमी धर्मेंद्र यांच्यापर्यंत पोहोचताच त्यावेळी त्यांनी जितेंद्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घरी धाव घेतली आणि त्यानंतर ते दोघंही मद्रासला रवाना झाले.

आणखी वाचा : अखेर अक्षयला मिळणार भारताचं नागरिकत्व; घेतला हा मोठा निर्णय

हेमा मालिनी यांच्या मद्रास येथील घरी पोहोचताच ते सर्व वातावरण कोणा एका चित्रपटाच्या कथेहून वेगळं नव्हतं. कारण, त्यावेळी हेमा यांच्या वडिलांनी धर्मेंद्र यांना अक्षरश: धक्के मारून घराबाहेर काढलं होतं. तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यातून का निघून जात नाही. तुम्ही विवाहित आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही, असंच ते वारंवार म्हणत होते. शेवटी त्यांच्याकडे गयावया करुन धर्मेंद्र यांनी हेमा यांच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळवली. धर्मेंद्र आणि शोभा दोघंही त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. हेमा यांनी ही चूक करु नये अशी विनंती धर्मेंद्र त्यांना करत होते.

शेवटी हेमा त्या खोलीतून बाहेर आल्या, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरुन सर्व तेज नहीसं झालं होतं. त्यांनी घरातल्या मंडळींकडे काही दिवसांचा अवधी मागितला. पण, लग्न होईल त आता नाहीतर कधीच नाही, अशी परिस्थिती जितेंद्र आणि त्यांच्या आईवडिलांनी उभी केली होती. उपस्थित सर्वजण एकाच उत्तराची वाट पाहात होते. शेवटी हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेंद्रसोबतचं त्यांचं लग्न तुटलं. जितेंद्र यांना तो अपमान सहन झाला नाही. ते तडक त्या ठिकाणाहून निघून गेले होते.