धर्मेद्र, सनी देओल आणि करण देओल अशा तीन पिढय़ा एकत्र अनुभवण्याची संधी याआधी क्वचितच लोकांना मिळाली असेल. मात्र सध्या हे तिघेही एका आगामी चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही नांदत असल्यावरून स्टारपुत्रांवर टीकेची झोड उठत राहिली आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडून कायमच कलाकारांच्या घरात जन्म घेतला म्हणून सगळे सोपे असते असे नाही, हा पवित्रा घेतला गेला आहे. या वेळी खुद्द धर्मेद्र यांनी कलाकारांची त्याहीपेक्षा स्टारच्या घरात जन्माला येणाऱ्या मुलांचे जगणे अवघड असते, असे मत आपल्या नातवाला आलेल्या अनुभवाच्या निमित्ताने व्यक्त केले. त्यांना शाळेपासूनच अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच अनेक कलाकारांची मुलं परदेशात शिकणं पसंत करतात, असेही ते म्हणाले.

‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर तिघेही ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एकत्र आले होते. या चित्रपटातून अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे, तर या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सनी देओल यांनी दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या करणला इतक्या मोठय़ा कलाकाराच्या घरात जन्माला आल्यानंतर जगणे किती सोपे होते किंवा अवघड होते, असा प्रश्न कपिलने करणला विचारला होता. त्यावर आपल्यासाठी अवघडच गेले, असे करणने स्पष्ट केले. अनेकदा कलाकारांच्या मुलांना काय करावं लागतं, त्यांना सगळं सहजसोपं मिळत जातं, असा लोकांचा समज असतो. तोही या अनुभवातून गेला असल्याचे त्याने सांगितले. शाळेत अनेकदा शिक्षक मला म्हणायचे, की तू फक्त एकाच कामासाठी बनलेला आहे, ते म्हणजे तुझ्या वडिलांच्या धनादेशांवर सही करण्यासाठी.. त्याच्यापलीकडे आयुष्यात तू काहीच करू शकत नाहीस. त्यांना अनेकदा मी अहंकारी, गर्विष्ठ वाटायचो. उलट, माझा स्वभाव अधिक शांत आणि आपल्याच कोशात जगणारा असा होता; पण त्यांनी ते कधीच समजून घेतले नाही, असे करणने स्पष्ट केले.

करणचा हा अनुभव ऐकल्यानंतर त्याच्याच बाबतीत घडलेला आणखी एक किस्सा ऐकवत धर्मेद्र यांनी स्टारपुत्रांचे जगणे किती अवघड असते, याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे मी करणचे ट्वीट हल्लीच वाचले. त्याच्या शाळेत काय-काय घडले हे त्याने मला फारसे कधी सांगितलेच नव्हते; पण एकदा त्याच्यापेक्षा मोठय़ा असलेल्या चार मुलांनी त्याला उचलून वर्गाबाहेर फेकून दिले आणि तू सनी देओलचा मुलगा असशील तर चल उठून दाखव.. असे आव्हान त्यांनी त्याला दिले. अर्थात, करण ते करूच शकला नाही. स्टारचा मुलगा आहे म्हणजे तो सगळंच करू शकतो, असं वाटणं आणि त्याला त्या पद्धतीने वागवणं हे चुकीचंच आहे. कलाकारांच्या मुलांना इथल्या शाळांमध्ये सामान्य मुलांप्रमाणे शिकता येत नाही, म्हणून अनेकदा त्यांची मुलं परदेशात शिकणं पसंत करतात, असेही धर्मेद्र यांनी सांगितले. तेव्हा करणने मला ही गोष्ट सांगितली नव्हती. सांगितली असती तर मी त्या खोडकर मुलांचा समाचार घेतला असता. असाही मी ‘दबंग’ म्हणूनच प्रसिद्ध आहे, असंही ते मिश्कीलपणाने म्हणाले. धर्मेद्र यांच्या टिप्पणीनंतर सेटवरचे वातावरण हलकेफुलके झाले. मात्र प्रत्येक कलाकाराच्या मुलाला अशा प्रकारच्या वागण्याचा सामना करावाच लागतो. मीही तो केला होता आणि करणलाही त्यातून जावे लागले आहे, असे म्हणत सनी देओलने हाही कलाकारांच्या जीवनशैलीचा भागच असल्याचे स्पष्ट केले.