ब्रम्हांडनायक मूवीज् निर्मित ढोल ताशे लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकीर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारतीय संस्कृतीत तरुणाईच्या मनगटातील बळ आणि सर्जनशीलतेची कसोटी पाहणारा रांगडा कलाप्रकार म्हणून ढोल ताशांकडे पाहिलं जातं. गणेशोत्सवात अभ्यास, ताण-तणाव या सगळ्या किचकट जीवनशैलीतून काही क्षणांचा विरंगुळा म्हणून तरुणाईची पाऊलं ढोल ताशांकडे वळताना दिसतात. आपली संस्कृती जपून ढोल ताशा पथकांसाठी झटणाऱ्या तरुणाईला व्यावसायिकतेकडे कसं वळवता येईल याचं चित्रण ३ जुलैला येऊ घातलेल्या ‘ढोल ताशे’ या चित्रपटात करण्यात आलं आहे.
भारतीय संस्कृतीत आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या ढोल ताशे पथकांसाठी लढणाऱ्या तरुणांचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या ढोल ताशा पथकांना व्यावसायीकरण मिळवून देण्यासाठी झटणारा तरुण अभिजित खांडकेकर याने साकारलाय तर त्याच्या विरुद्ध भूमिकेत जितेंद्र जोशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ऋषिता भट्ट आपल्याला या चित्रपटातून पुन्हा एकदा मराठीत दिसणार आहे. त्याव्यतिरिक्त या चित्रपटात प्रदीप वेलणकर, इला भाटे, विनय आपटे आणि इतर कलावंत ही आहेत.
गुरु ठाकूर यांच्या गीतरचनेला निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलं आहे. छायाचित्रदिग्दर्शन केदार प्रभाकर गायकवाड यांनी केले आहे तर वेशभूषा पूर्ती कुलकर्णी यांनी साकारली आहे. येत्या ३ जुलै ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.