सोशल मीडिया हे सध्याच्या घडीला अत्यंत प्रभावी माध्यम मानलं जातं. मात्र हे माध्यम जेवढं प्रभावी आहे तेवढंच ते ट्रोलिंगसाठीही वापरलं जातं. एखाद्या कलाकाराला, एखाद्या राजकीय नेत्याला ट्रोल केलं जातं अशी अनेक उदाहरणं घडली आहेत. ‘धुरळा’ या सिनेमाची टीम नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर चर्चा करण्यासाठी आली होते. ‘धुरळा’ हा एक राजकीय सिनेमा आहे. या सिनेमातल्या कलाकारांनी सोशल मीडियाबाबत त्यांची भूमिका मांडली. सोशल मीडियावर व्यक्त होणं किंवा व्यक्त होणं म्हणजे सामाजिक भान नाही असं या कलाकारांना वाटतं आहे.

#पुन्हा निवडणूक हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता त्याबाबत काही नेत्यांनी थेट कलाकारांवर टीका केली, त्याबाबत काय वाटतं? असं विचारलं असता, सई ताम्हणकर म्हणाली “ट्रोलिंगची आम्हाला सवय आहे. ट्रोल होणं, टीका होणं हे कलाकारांच्या आयुष्यातला भाग आहे. ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. मात्र त्याचे पडसाद असे उमटतील याची कल्पना आम्हालाही नव्हती.”

मराठी कलाकारांकडून सामाजिक भान जपलं जात नाही अनेक प्रश्नांवर मराठी कलाकार व्यक्त होताना दिसत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला,  या प्रश्नावर अंकुश चौधरीने त्याचं परखड मत व्यक्त केलं. अंकुश म्हणतो, “यापूर्वी फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, हॅलो अॅप काहीही नव्हतं. त्याहीवेळी आम्ही व्यक्त व्हायचो नाही. मग आता का व्यक्त व्हायचं? अर्धी माणसं सोशल मीडियावर व्यक्त झाल्याने तुटत असतील तर का व्यक्त व्हायचं? कलाकारांनी शांत राहायला हवं, त्याचं काम मनोरंजन करणं आहे ते त्याने करावं. त्याचं हे काम नाहीये की सतत फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियावर व्यक्त व्हावं आणि तुला काय वाटतं?तुम्हाला काय वाटतं ? याची चर्चा करणं. सामाजिक भान म्हणजे शांतपणे जाऊन मदत करणं. जे केलं आहे त्याची वाच्यता न करणं कधीही चांगलं. त्याचं एक वेगळं समाधान मिळतं”

अभिनेत्री सई ताम्हणकरनेही या प्रश्नाचं उत्तर दिलं. सई म्हणते, ” व्यक्त होणं म्हणजे सामाजिक भान असणं असं नाही. ज्या गोष्टींचं सामाजिक भान आहे त्या गोष्टी आम्ही ‘ग्राऊंड लेव्हल’ला जाऊन आम्ही काम करतो. ते लोकांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.”

अलका कुबल म्हणाल्या, “आमच्या इंडस्ट्रीतही जर एखादा लाईटमन किंवा आमच्या टीमपैकी कुणाला काही गरज असेल, त्यांच्यावर वाईट वेळ आली, संकटं आली तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या व्यक्तीला मदत करतो. एखाद्या अभिनेत्यावरही वाईट वेळ आली तर आम्ही त्यालाही मदत करतो. सगळे कलाकार एकत्र येऊन मदत करतात.”

सिद्धार्थ जाधव म्हणतो, “हिंदी आणि मराठी कलाकारांची तुलना करणं सोडून द्या. हिंदी कलाकार सोशल मीडियावर व्यक्त झाले किंवा इतर कुठेही व्यक्त झाले की मराठी कलाकार अशी भूमिका घेत नाहीत अशी एक तक्रार केली जाते. तुलना करणं वाईट आहे. भरत जाधव, अतुल कुलकर्णी हे कलाकार किंवा इतर असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या परिने मदत करतात. सांगली, कोल्हापूरचा पूर आला तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक असे कलाकार आहेत जे समोरही आले नाहीत पण त्यांनी लोकांना मदत केली. प्रत्येकवेळी मराठी कलाकार आणि हिंदी कलाकार अशी तुलनाच करु नका. अनेकदा ट्रोलिंग इतकं भीषण होतं, इतक्या खालच्या पातळीवर टीका होते. मग मराठी कलाकार म्हणून लाज वाटते. ट्रोलिंगची आम्हाला सवय आहे, सईच्या मताशी मी सहमत आहे. मात्र जेव्हा पातळी सोडून ट्रोलिंग होतं तेव्हा वाटतं की आपण कलाकार होण्यापेक्षा हमाली केली असती तर बरं झालं असतं. कलाकार आहे म्हणून व्यक्त व्हायलाच हवं असं नाही. सगळे कलाकार आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून मदत करत असतात.”

सोनाली कुलकर्णीनेही तिचं मत व्यक्त केलं, सोनाली कुलकर्णी म्हणते, “सूर्य, चंद्र आणि सत्य या तीन गोष्टी कधीही लपून रहात नाहीत. #पुन्हानिवडणूक हा जेव्हा ट्रेंड झाला तेव्हा आम्ही काहीही बोललो नाही कारण तीन दिवसातच ते काय होतं हे सगळ्यांना समजलं. कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्ट करणं तेही पब्लिक प्लॅटफॉर्मवर हे अत्यंत गरजेचं आहे असं काही नाही. व्यक्त झालो नाही म्हणजे आम्हाला भावना नाहीत का?” असाही प्रश्न सोनालीने विचारला.

‘धुरळा’ सिनेमाचे लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतात, ” अर्जन्सी टू रिअॅक्ट याचं प्रमाण वाढलं आहे. माझ्यापर्यंत येतं ते मत आहे की माहिती आहे हेच अनेकदा कळत नाही. एखादी गोष्ट जेव्हा कुणीही समोर आणतं तेव्हा ती माहिती आहे की मत आहे हेच लक्षात येत नाही. मग त्यावर व्यक्त करण्याची घाई झाली की वेड्यात काढणारी इतर माणसं असतात. ते म्हणतात की अरे असं नाहीच. आपल्यापर्यंत कोणती गोष्ट पोहचते आहे, ती कोणत्या स्वरुपात येते आहे मग त्यावर व्यक्त व्हायचं की नाही हा ठरवण्याचा वेळ दिला जात नाही. मात्र अर्जन्सी टू रिअॅक्टच्या प्रक्रियेच्या बाहेर अनेक मराठी कलाकार पडले आहेत. ते आपल्या परिने सामाजिक भान जपत आहेत.