‘संजू’ चित्रपटात संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारत असलेल्या दिया मिर्झानं संजय दत्तसाठी खास भेटवस्तू खरेदी केली आहे. या भेटवस्तूसाठी तिनं तब्बल १ लाख ४५ हजार रुपये मोजले आहेत. ही भेटवस्तू संजयसाठी खूपच महत्त्वाची ठरेल असा विश्वास तिला आहे.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका लिलावात तिनं ‘मदर इंडिया’ चित्रपटाचं पोस्टर खरेदी केलं आहे. नर्गिस आणि सुनिल दत्त यांची मुख्य भूमिका असलेला ‘मदर इंडिया’ चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले. आजही हा बॉलिवूडमधला सुपरहिट चित्रपट म्हणून गणला जातो. एका कार्यक्रमादरम्यान दियानं हे सर्वात जुनं पोस्टर खरेदी केलं होतं.
संजय दत्त त्याच्या आईच्या खूपच जवळ होता, म्हणून याव्यतिरिक्त सर्वोत्तम भेट संजयसाठी दुसरी असूच शकत नाही असं दियाला वाटतं. तब्बल १ लाख ४५ हजार रुपये मोजून तिनं हे पोस्टर खरेदी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दिया मिर्झा बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांसमोर येत आहे. आज ( २९ जून) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, दिया मिर्झाबरोबरच मनिषा, परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा हे बडे कलाकारदेखील पाहायला मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 10:44 am