टीव्हीवर सर्वाधिक काळ चाललेली विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेचे व मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे जगभरात चाहते आहेत. यामध्ये जेठालाल (दिलीप जोशी) आणि ग्लॅमरस बबिता (मुनमुन दत्ता) यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. पडद्यावर जेठालाल नेहमीच बबिताच्या मागे असल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला माहित आहे का, ऑफस्क्रीन या दोघांमध्ये एकदा चांगलीच बाचाबाची झाली होती.

२०१७ मधील ही घटना आहे. मालिकेच्या सेटवरच दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्यात वाद झाला. दिलीप जोशी यांचे काही मित्र त्यांना भेटायला सेटवर आले होते. त्यावेळी त्यांनी सेटवरील प्रत्येक कलाकारासोबत फोटो काढले. मुनमुनसोबतही त्यांना फोटो काढायचे होते. मात्र मुनमुनने फोटो काढण्यास नकार दिला आणि जेठालालचे चाहते नाराज झाले. मालिकेच्या टीमबद्दल तुम्ही चुकीची प्रतिमा तयार करत आहात, असं दिलीप जोशी मुनमुनला म्हणाले. ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, छोट्या छोट्या गोष्टींसाठी अहंकार दाखवणं सोडून द्या, असंही दिलीप जोशी मुनमुनला म्हणाले होते. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला.

https://www.instagram.com/p/BtqL_aZhbUM/

नंतर काही दिवसांनी दिलीप जोशी व मुनमुन यांनी त्यांच्यातील मतभेद दूर केले. ‘तारक मेहता..’ या मालिकेचे जगभरात चाहते आहेत. त्यातील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांना मनावर एक विशेष छाप सोडली आहे. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही या मालिकेचा प्रेक्षकांना कंटाळा येत नाही.