अभिनेता हृतिक रोशन हा आता बॉलिवूडमधल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असला तरी स्टारकिड असूनही करिअरच्या सुरुवातीला त्याला बराच संघर्ष करावा लागला होता. ‘मिशन काश्मीर’ हा हृतिकच्या करिअरमधला दुसरा चित्रपट होता आणि या चित्रपटासाठी त्याला सहअभिनेत्री प्रिती झिंटापेक्षा कमी मानधन मिळालं होतं. या चित्रपटाच्या पडद्यामागच्या गोष्टी सुकेतू मेहता यांच्या ‘मॅग्झिमम सिटी’ या पुस्तकात उलगडल्या आहेत.

‘मिशन काश्मीर’मधील अल्ताफच्या भूमिकेसाठी सुरुवातीला शाहरुख खानला तर इनायत खानच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना निवडण्यात आलं होतं. मात्र ‘मोहोब्बतें’ या चित्रपटात एकत्र काम करण्यासाठी दोघांनीही ‘मिशन काश्मीर’ला नकार दिला. तेव्हा दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी हृतिक रोशन आणि संजय दत्त यांना निवडलं. हृतिकच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही महिन्यांनंतर ‘मिशन काश्मीर’ प्रदर्शित झाला होता.

आणखी वाचा : हृतिकला आल्या होत्या लग्नाच्या तब्बल ३० हजार मागण्या

हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. फक्त भारतातच नाही तर विदेशातही त्याची चर्चा होऊ लागली होती. मात्र तरीही ‘मिशन काश्मीर’ या त्याच्या दुसऱ्या चित्रपटासाठी त्याला ११ लाख रुपये मानधन मिळालं होतं. तर या चित्रपटात हृतिकसोबत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिती झिंटाला १५ लाख रुपये मानधन देण्यात आलं होतं. ‘मॅग्झिमम सिटी’ या पुस्तकात या मानधनाचा उल्लेख करण्यात आला आहे.

अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी हृतिकने पाच वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यावेळी स्टारकिड असूनही मिळेल ते खाणं, सेटवर तंबूत झोपणं या गोष्टी त्याने इतरांसारख्याच स्वीकारल्या होत्या, असं त्या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. आता हृतिक एका चित्रपटासाठी तब्बल २ कोटी रुपये मानधन घेतो.