‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर. गेल्या १२ वर्षांपासून आत्माराम तुकाराम भिडे या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मंदार हे मेकॅनिकल इंजीनिअर आहेत. अभिनयात करिअर करण्यासाठी त्यांनी दुबईतील नोकरीला रामराम केला होता.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत मंदार यांनी याबाबत सांगितलं होतं. “२००८ पर्यंत मी खूप संघर्ष केला. दुबईत मेकॅनिकल इंजीनिअर म्हणून काम करत होतो. २००० मध्ये तिथली नोकरी सोडून मी भारतात परतलो. कारण मला अभिनयात करिअर करायचं होतं. लहानपणापासूनच मला अभिनयाची फार आवड होती. मी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं पण मनासारखी भूमिका मला मिळाली नाही. अखेर २००८ मध्ये मला ‘तारक मेहता’ची संधी मिळाली”, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : आत्महत्येच्या तीन दिवस आधी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देऊन सुशांत म्हणाला…

‘तारक मेहता..’ मालिकेत काम केल्यापासून त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. “मी ज्या मालिकेत काम करतोय ती इतकी लोकप्रिय होईल याचा विचारसुद्धा केला नव्हता. सहसा लोक मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याचं स्वप्न पाहतात. पण ‘तारक मेहता..’च्या मालिकेतच मोठमोठे सेलिब्रिटी आले. जेव्हा अमिताभ बच्चन आमच्या मालिकेत आले तेव्हाचा क्षण अविस्मरणीय होता. बिग बींसोबतच शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार हेसुद्धा सेटवर आले होते”, असं त्यांनी पुढे सांगितलं.