‘आज माणसाच्या जगण्यात आलेल्या एकूणच थिल्लरतेमुळे टीव्हीच्या स्वस्त आणि घरबसल्या मिळणाऱ्या फुकट करमणुकीला सोकावलेल्या प्रेक्षकांना नाटकाकडे आणणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे त्यांना खिळवून ठेवील अशा क्लृप्त्या योजूनच अर्थपूर्ण असे काही त्यांच्या गळी उतरविणे भाग आहे,’ असे उद्गार संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी काढले.
नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यंदाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते नाटककार शफाअत खान, नेपथ्य-प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये आणि नाटय़समीक्षक शांता गोखले यांचा ‘आविष्कार’ परिवारातर्फे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
सत्कारानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात शफाअत खान यांनी नाटककार म्हणून झालेली आपली जडणघडण विशद केली. लहानपणी यक्षगानापासून निरनिराळ्या गावांतील यात्रा-जत्रा-उत्सवांमधील नाटकांचा प्रभाव आपल्यावर पडल्याचे सांगून ते म्हणाले की, प्रत्यक्ष रंगमंचावरील नाटकापेक्षाही रंगमंचामागील कलावंतांच्या व्यवहार आणि वर्तनाच्या निरीक्षणाने माझी तिरकस लेखनशैली विकसित झाली. त्यातूनच पुढे कृष्णसुखात्मिका माझ्या हातून लिहिल्या गेल्या.
‘राहिले दूर घर माझे’ आणि ‘गांधी आडवा येतो’ या दोन नाटकांचा अपवाद करता शफाअत खान यांनी सहसा वास्तववादी नाटके लिहिलेली नाहीत. मात्र, अद्भुतता आणि वास्तव यांचा विलक्षण मेळ असलेली ब्लॅक कॉमेडी शैलीतील त्यांच्या बिनवास्तववादी नाटकांना आजपर्यंत एकही दिग्दर्शक न्याय देऊ शकलेला नाही. अगदी स्वत: शफाअत खान यांनी आपले नाटक बसवले तरी ते स्वत:ही आपल्या नाटकाला न्याय देऊ शकले नाहीत, असे मत नाटककार व पत्रकार जयंत पवार यांनी व्यक्त केले. प्रदीप मुळ्ये यांच्या रंगकार्याबद्दल बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी, गेली ३०-३५ वर्षे प्रदीप मुळ्ये यांनी मराठी रंगभूमीवरील ‘दुर्गा झाली गौरी’, ‘राजा सिंह’, ‘वाडा चिरेबंदी’ नाटय़त्रयी, ‘प्रपोजल’, ‘दोन स्पेशल’ आदी अनेक नाटकांचे अत्यंत सर्जनशील असे नेपथ्य करून त्यांच्या निर्मितीमूल्यांत मोठेच योगदान केल्याचे सांगितले. ज्येष्ठ नाटय़समीक्षक शांता गोखले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर ज्या वैविध्यपूर्ण प्रतिक्रिया उमटल्या, त्याआधारे त्यांच्या लेखनाची तरुण पिढीने कशा प्रकारे दखल घेतली याचे बोलके चित्र रंगकर्मी रामू रामनाथन यांनी आपल्या भाषणात उभे केले. या अनौपचारिक सत्कार सोहळ्यानंतर संतोष अयाचित दिग्दर्शित ‘अनकही’ हा विजय तेंडुलकर यांच्या विविध विषयांवरील मुक्त गप्पांच्या स्वरूपातील लघुपट दाखविण्यात आला.