11 August 2020

News Flash

विचित्र योगायोग

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा हा अखेरचा चित्रपट.

संग्रहित छायाचित्र

योगायोग आपल्याला फार जवळचे वाटतात. त्यांचे अनुभव अनेकदा चकवणारे असले तरी ते हवेसे वाटतात. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट मात्र याला अपवाद ठरला आहे. एक विचित्र योगायोग या चित्रपटात आहे, पडद्यावर जे घडतं आहे- दिसतं आहे त्याउलट वास्तवात आपण काही तरी अनुभवलं आहे ही भावना हा चित्रपट पाहताना मनात घट्ट धरून असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा हा अखेरचा चित्रपट. त्याच्या जाण्याची जणू आधीच कोणाला चाहूल लागावी आणि त्या भरात लिहिलेली त्याच्यावरची शोकांतिका आपल्यासमोर सादर व्हावी इतका विचित्र योगायोगाचा अनुभव हा चित्रपट देतो.

मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ‘डिस्ने-हॉटस्टार’वर प्रदर्शित झाला आहे. मुकेश यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. पहिलेपणाची छाप या चित्रपटाच्या तंत्रावर नाही, पण कथेच्या मांडणीत फार जाणवते. मुळात हा चित्रपट सुशांतच्या निधनानंतर दीड महिन्याने प्रदर्शित झाला आहे. त्याचं जाणं हा देशभरातील त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता, आजही आहे. या धक्क्यातून लोक अजूनही बाहेर पडलेले नाहीत. आणि त्याच्या जाण्यानंतर आजतागायत जे वादांचं मोहोळ दिवसागणिक इंडस्ट्रीत वाढतंय, त्याने सुशांत अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, त्याहीपेक्षा त्याच्या अचानक आणि अनाकलनीय जाण्याचा सल या वादांनंतर अधिकच टोचतो आहे. या पार्श्वभूमीवर सुशांतचा तोच हसतमुख, प्रेमळ चेहरा पाहिल्यानंतर कथा मागे पडते आणि पडद्यावर दिसणारा सुशांत आपण अधिक अनुभवत राहतो. ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात किझी बासू (संजना संघी) आणि इमॅन्युअल राजकु मार ज्युनिअर (सुशांत सिंह राजपूत) यांची प्रेमकथा पाहायला मिळते. दोघेही कर्करोगाने ग्रस्त आहेत. किझीला घशाचा कर्करोग आहे आणि सतत ऑक्सिजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन तिच्या आयुष्यातील कित्येक वर्षांची पानं कं टाळलेपणाने पुढे सरकताहेत. तर इमॅन्युअल ऊर्फ मॅनीला हाडाचा कर्करोग आहे. या कर्करोगात त्याने एक पाय गमावला आहे. एकीकडे सतत आईवडिलांच्या प्रेमाच्या सावलीत असलेली किझी आणि दुसरीकडे आईवडिलांपासून दूर आजीबरोबर राहणारा मॅनी या दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी आहेत. पण प्रेमाला अशा चौकटी नसतात. उत्साहाच्या धबधब्यासारखा मॅनी आणि शांत-सहज, गोड स्वभावाची किझी.. दोघांनाही माहिती आहे त्यांच्या आयुष्याचा पट फार मोठा नाही. आणि तरीही या पटात प्रेमाचे रंग भरण्याची तयारीही ते करतात. त्यांची प्रेमकथा पुढे जाण्यासाठी आणखी एक उद्देश या दोघांकडे आहे तो म्हणजे किझीचा आवडता संगीतकार अभिमन्यू वर्माचा शोध आणि त्याच्या अर्धवट राहिलेल्या गाण्यामागचे कारण शोधणं.. या शोधाच्या प्रवासातच त्यांची प्रेमकथा अधिक घट्ट होत जाते. एक होता राजा आणि एक होती राणी यांची ही गोष्ट सुखांत नाहीच.. आणि एका अर्थी आहे.

सुशांतचे मूळ लाघवी व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या वाटय़ाला आलेली उत्साही, सतत आनंदी जगण्याचा ध्यास घेतलेल्या मॅनीची व्यक्तिरेखा एकमेकांत अगदी सामावून गेल्या आहेत. किझीसाठीही संजनाची निवड एकदम अचूक आहे. दु:खाची किनार लेवून आलेल्या या प्रेमकथेला चित्रपटात घडणाऱ्या भोजपुरी चित्रपटाची कथा गंमत आणते. किझीच्या आई-बाबांच्या भूमिके तील सास्वता चॅटर्जी आणि स्वस्तिका मुखर्जी या दोन कलाकारांनीही रंगत आणली आहे. किझीच्या कथेच्या तुलनेत मॅनीचे आईबाबा, त्याचं आजारपण या सगळ्या गोष्टी शेवटच्या काही मिनिटांत तोंडी लावण्यापुरत्या येतात. तोवर सिनेमाचा पडदा हा सुशांत आणि सुशांतनेच व्यापून टाकला आहे. कथा आणि चित्रपट म्हणून ‘दिल बेचारा’ हा वेगळा अनुभव देत नाही, पण ज्याचा अखेरचा चित्रपट म्हणून आपण तो पाहतो त्याचं पडद्यावरचं प्रत्येक क्षणातलं अस्तित्व आपल्याला भारून टाकतं. सुशांत या जगात नाही याचं भानही नकळतपणे गळून पडतंय न पडतंय.. तोच त्याची पडद्यावरची जगण्याची धडपड आणि प्रत्यक्षात सगळं मागे ठेवून सहजी निघून जाणं याची सांगड घालता येत नाही. कदाचित म्हणून या चित्रपटात त्याला शेवटचं पाहताना अधिक बिचारं वाटू लागतं, असहाय वाटत राहतं.

दिल बेचारा

दिग्दर्शक – मुकेश छाब्रा

कलाकार – सुशांत सिंह राजपूत, संजना संघी, साहिल वेद, सास्वता चॅटर्जी, स्वस्तिका मुखर्जी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:10 am

Web Title: dil bechara movie reviews abn 97
Next Stories
1 ओटीटीची साहित्यवाट
2 “बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील माहित नव्हतं”; रोहित पवार यांचा उपरोधिक टोला
3 आपली धुणी चारचौघात कशाला धुवायची? सुशांत आत्महत्या प्रकरणात नसीरुद्दीन शाह यांची उडी
Just Now!
X