बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनी या संबंधीत माहिती दिली आहे.

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना नॉन कोविड रुग्णालय हिंदुजा येथे दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी ट्वीट करत सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. आता दिलीप कुमार यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे समोर आले आहे.

करोनाची लागण झाल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. ही बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. मात्र, दिलीप कुमार यांचे नेहमीच काही रूटिन चेकअप होत असतात. तर, याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.