बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो समोर आला आहे.

दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांचा रुग्णालयातील फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो त्यांची काळजी घेताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

आणखी वाचा : ‘रात्री झोपताना मुलांचा व्हिडीओ कॉल सुरु ठेवते’, श्वेता तिवारीने सांगितले कारण

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काल ट्वीट करत सायना बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. “दिलीप कुमार साहब यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना उद्या रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार आहे,” असे सायरा बानो म्हणाल्या.

करोनाची लागण झाल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. ही बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. मात्र, दिलीप कुमार यांचे नेहमीच काही रूटिन चेकअप होत असतात. तर, याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. आता चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.