ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज (११ डिसेंबर) ९६ वा जन्मदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र दिलीप कुमार यांना वाढदिवस साजरा करणं मुळीच पसंत नाही अशी माहिती त्यांचे जवळचे मित्र फैजल फारुखी यांनी दिली.

‘२०११ साली दिलीपजींनी त्यांचा ८९ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी घरी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांच्या सहवासात दिलीपजींनी तो दिवस खूप आनंदात घालवला. त्यांनी मनमुराद आनंद लुटलेला तो त्यांचा शेवटचा वाढदिवस होता. नंतर मात्र त्यांनी वाढदिवस साजरा करायला नकार दिला. आधीही त्यांचा या गोष्टीला नकारच होता. आपला वाढदिवस जंगी साजरा व्हावा असं त्यांना कधीही वाटलं नाही. मुळात त्यांना वाढदिवस साजरा करायलाच आवडत नाही’ असंही फारुखी म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली होती. फुफ्फुसांना जंतुसंसर्ग झाल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती उत्तम आहे अशी माहिती फारुखी यांनी दिली आहे. त्यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्तानं सायरा बानू यांनी घरी मित्रपरिवारासाठी छोट्या मेजवानीचं आयोजन केलं असल्याचंही ते म्हणाले.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग , कोहिनूर यांना नावानं आज जग ओळखत असलं तरी त्यांचं खर नाव युसुफ खान होय. वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९४४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. पण दिलीप कुमार यांना खरी ओळख १९४७ मध्ये आलेल्या ‘जुगनू’ चित्रपटाने दिली. ‘मुघल- ए- आझम’ चित्रपटात त्यांनी साकारलेली सलीमची भूमिका प्रचंड गाजली होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी जवळपास ६५ चित्रपटांमध्ये अभिनय केला. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘किला’ चित्रपटानंतर दिलीप कुमार मोठ्या पडद्यावर झळकले नाहीत.