दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना करोनाची लागण झाली आहे. एहसान खान (९० वर्षे) आणि अस्लम खान (८८ वर्ष) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी antigen टेस्ट घेण्यात आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही भाऊ दिलीप कुमार यांच्यासोबत राहत नाहीत. लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर दोघांवर उपचार करत आहेत.

पारकर म्हणाले की, ‘‘एहसान आणि अस्लम यांना शनिवारी रात्री उशीरा रुग्णालयात आणलं गेलं होतं. तपासात त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या शरिरात ऑक्सिजनची मात्रा खूप कमी आहे. दोघांनाही वेंटेलिटरवर ठेवण्यात आलं आहे.”

दिलीप कुमार (९७ वर्ष) यांनी मार्च मध्ये ट्विट करत आरोग्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘मी आणि माझी पत्नी सायरा बानू(७५ वर्ष) ठीक असून आयसोलेशनध्ये आहोत. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून आम्ही असं केलं आहे. करोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सायरा प्रयत्न करतेय.’

दरम्यान, बच्चन परिवारासह इतर कलाकारांनाही करोनाची लागण झाली होती. काहींनी करोनावर मात केली तर काही अद्याप उपचार घेत आहेत. देशभरात करोना रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५३ हजार ३२२ रुग्ण बरे झाले. एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १८ लाख ६२ हजार २५८ झाली असून, ६ लाख ७७ हजार ४४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ७२ टक्क्यांवर गेले आहे. देशभरात सुमारे ३ कोटी नमुना चाचण्या झाल्या असून, गेल्या २४ तासांमध्ये ७.४६ लाख चाचण्या करण्यात आल्या.