पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारनं बॉलीवूड शोमॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित घरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासह फाळणीपूर्वीची अनेक घरं खरेदी करून पाकिस्तान सरकारला राष्ट्रीय वारसा घोषित करायचा आहे. पाकिस्तानमधील सरकारच्या या निर्णयाचं दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी कौतुक केलं आहे.

दोन्ही कलाकारांची वडिलोपार्जित घरे पेशावरच्या प्रसिद्ध किस्सा खवानी बाजारात आहेत. राज कपूर यांच्या घराचे नाव कपूर हवेली असून त्यांचे आजोबा १९१८ ते १९२२ दरम्यान उभारले होते. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच घरात झाला.

या ऐतिहासिक इमारतींची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जर त्यांची पुढील काळजी घेतली गेली नाही, तर ती इमारत मोडकळीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला संरक्षण देण्याच्यासाठी पाकिस्तान सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. “जेव्हा जेव्हा पाकिस्तान सरकारनं दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित हवेलीला संग्रहालयात रूपांतरित करण्याचा विचार केला तेव्हा मला खूप आनंद झाला. सरकारच्या या निर्णयाचे मी नेहमीच कौतुक करते. या वेळी हे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया सायरा बानो यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलाताना दिली. “काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील आपल्या हवेलीत गेल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. “या घरात आपले पती दिलीप कुमार यांच्या अनेक सुखद आठवणी आहेत आणि त्या अमूल्य आहेत. जेव्हा ते अखेरचे या ठिकाणी गेले होते तेव्हा ते खुप भावूक झाले होते,” असंही त्या म्हणाल्या.