नट म्हणून तुम्ही केलेल्या तयारीचा माणूस म्हणून तुमच्यावर सकारात्मक परिणाम व्हायला हवा, तो तसा न झाल्यास तुम्ही माणूस म्हणून कोरडे नट राहाल, माणूस राहाणार नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवाचे आयोजक सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, किरण धिवार या प्रसंगी उपस्थित होते.

प्रभावळकर म्हणाले, चित्रपटाच्या क्षेत्रातील आदर्श म्हणून कोणा एकाचे नाव मला घेता येणार नाही. ज्या ज्या अभिनेत्यांबरोबर मी काम केले, त्यांचे मी निरीक्षण केले आणि त्यातून मला भरपूर शिकायला मिळाले. गजेंद्र अहिरे, क्षितिज पटवर्धन, आदित्य सरपोतदार अशा तरुण दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांच्याबरोबर काम करताना मिळणारी नवीन ऊर्जा, नवीन कल्पना असे सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळते. नवीन कल्पनांचा स्वीकार करण्यासाठी खुल्या असलेल्या कलाकारांसाठी प्रत्येक टप्प्यावर शिकण्यासारखे खूप काही असते. सुमित्रा भावे यांच्याबरोबर काम करण्याची संधी अद्याप मिळाली नाही.

प्रभावळकर म्हणाले, ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटामध्ये मला वृद्धाश्रमातील एका वृद्धाची भूमिका करायची होती. राजकुमार हिरानीला अचानक वाटले, महात्मा गांधींची भूमिका मी करू शकतो. केस कापायला सांगितले. त्याच दरम्यान राम गोपाल वर्मा याच्याकडून बोलावणे आले. ‘शिवा’ चित्रपटात वाईट मोठय़ा गुंडाचा हस्तक असलेली गृहमंत्र्याची भूमिका होती. केस कापले आहेत असे सांगत टोपी काढून राम याला दाखवले तर, या भूमिकेसाठी असेच बारीक केस हवे आहेत, असे त्याने सांगितले. त्याच केस कापलेल्या डोक्याने िहसा आणि अिहसा अशा विरोधाभास असलेल्या दोन भूमिका एकाच वेळी मी साकारल्या.‘डायरेक्टर्स अ‍ॅक्टर’ आणि ‘एडिटर्स, पब्लिशर्स रायटर’ असल्याचे सांगत प्रभावळकर यांनी ‘लोकसत्ता’साठी लिहिलेल्या ‘अनुदिनी’ या सदराची आठवण जागविली. दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले, तरी चित्रपट आणि नाटक हेच आवडीचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. आगाशे म्हणाले, दिलीपची अनेक रूपे आहेत. ‘बिकट वाट वहिवाट’ नाटकात दिलीपने अप्रतिम काम केले. तो पुण्यात आलाय आणि आम्हाला स्पर्धक खूप आहेत. त्याच्या इतक्या विविध भूमिका केलेला दुसरा नट महाराष्ट्रात नाही. सहज भूमिका साकारणे हे त्याचे वैशिष्टय़ असून तो कुतूहल वाटावे असे काम करतो. दिलीप म्हणजे निखळ आनंद आहे. आपण जे अनुभवतो ते त्याच्या नजरेतून पाहणे वेगळा अनुभव आहे.